कृषी

कृषि विज्ञान केंद्राच्या विषयतज्ञ आणि शेतकर्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाविषयी जागृकता निर्माण करणे गरजेचे – संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार

राहुरी विद्यापीठ : ड्रोन तंत्रज्ञान वेळेची बचत करणारे असून त्याच्या वापराविषयीची जागृकता कृषि विज्ञान केंद्राच्या विषयतज्ञ व शेतकर्यांमध्ये होणे गरजेचे आहे. औषध फवारणीच्या कामासाठी ड्रोनचा वापर वाढल्यास शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवि दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथे हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत शेतीसाठी ड्रोनचा वापर या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी करण्यात आले होते. यावेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख तथा या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सचिन नलावडे, कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे यावेळी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. दिलीप पवार म्हणाले की आधुनिक शेतीमध्ये नविन तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे आणि त्यामध्ये प्रामुख्याने ड्रोनचा शेतीतील वापर येणार्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात डॉ. सचिन नलावडे व डॉ. गिरीषकुमार भणगे यांनी शेतीसाठी ड्रोनचा वापर, ड्रोनचे प्रकार, तपशील व कार्यप्रणाली, फवारणीसाठी ड्रोनचा वापर, नियम, पुर्व तयारी, वापराच्या पध्दती व काम करतांना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.
डॉ. नंदकुमार भुते यांनी किड नियंत्रणासाठी ड्रोनची उपयुक्तता याबद्दल मार्गदर्शन केले. इंजि. निलकंठ मोरे यांनी प्रशिक्षणार्थींना कास्ट प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर फवारणीचे ड्रोनचे प्रात्यक्षिक दिले. कार्यशाळेच्या सांगता समारंभासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुनिल कदम यांनी तर सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन डॉ. गिरीषकुमार भणगे व इंजि. निलकंठ मोरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button