कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या सात नविन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ व उडदाच्या वाणांना भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. उसाचा फुले 11082 (कोएम 11082), गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तूरीचे फुले तृप्ती व फुले कावेरी, तीळ पिकाचा फुले पुर्णा आणि उडदाचा फुले वसु या वाणांचा समावेश आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाची शेतकर्यांसाठी उन्नत वाण देण्याची परंपरा कायम आहे. यावर्षी देखील राष्ट्रीय स्तरावर सात वाणांना मान्यता देण्यात आली, याचा फायदा निश्चितच शेतकर्यांना होणार आहे.  
_ कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील 
ऊस पिकाचा फुले 11082 हा लवकर पक्व होणार्या वाणाचे ऊस उत्पादनात 15.40 टक्के, साखर उत्पादन 13.52 टक्के, हा वाण तुल्यवाण कोसी 671 पेक्षा सरस आढळून आला आहे. साखर उतारा कोसी 671 इतकाच 14.17 टक्के मिळाला आहे. या वाणाचा वाढीचा वेग जास्त असून फुटव्यांची संख्या मर्यादित आहे. वाढ्यावर कुस नाही. या वाणाची मुळे जमिनीत खोलवर जात असून मुळांचा पसारा अधिक असल्याने पाण्याचा ताण सहन करणारा हा वाण असून, ऊस लोळण्याचे प्रमाण नगन्य आहे. हा वाण चाबूक काणी व पाने पिवळी पडणार्या रोगास प्रतिकारक असून मर आणि लालकूज या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. खोडकिड, कांडीकिड आणि शेंडेकिडीस कमी प्रमाणात बळी पडतो. हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आला आहे.
गव्हाचा सुधारीत वाण फुले अनुपम (एन.आय.ए.डब्ल्यु. 3624) या वाणाची महाराष्ट्रामध्ये नियंत्रित पाण्याखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. हा वाण आकर्षक टपोरे दाणे, प्रथिनांचे प्रमाण 11.4 टक्के असून तांबेरा रोगास प्रतिकारक्षम तसेच चपातीसाठी उत्तम वाण आहे. याचा पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस असून उत्पादन क्षमता 30 ते 35 क्वि./हे. असणार्या या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे.
रब्बी ज्वारीचा फुले यशोमती (आर.एस.व्ही. 1910) हा वाण महाराष्ट्रातील रब्बी हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 9.3 क्वि. असून उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 12.00 क्वि. आहे. प्रचलीत वाण फुले अनुराधा व मालदांडी 35-1 पेक्षा अनुक्रमे 8 टक्के आणि 19 टक्के अधिक उत्पादन देणारा असून याचा पक्वता कालावधी 112 ते 115 दिवस आहे. या वाणाचे पांढरे शुभ्र रंगाचे टपोरे दाणे असून हा खोड माशीस प्रतिकारक व खडखड्या रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
तूरीचा फुले तृप्ती (पी.टी.10-1) हा वाण देशाच्या मध्य विभागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत/बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 22.66 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 32.00 क्विंटल इतकी आहे. प्रचलीत वाण फुले राजेश्वरी आणि बी.डी.एन.-711 या वाणांपेक्षा या वाणांने अनुक्रमे 33.45 टक्के आणि 42.97 टक्के अधिक उत्पादन दिलेले आहे. या वाणाचा पक्वता कालावधी 165 दिवस आहे. या वाणाचे फिकट तपकिरी रंगाचे टपोरे दाणे असुन 100 दाण्यांचे वजन 10.81 ग्रॅम आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक असुन शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा कमी प्रार्दुभाव दिसून आला.
तुरीचा दुसरा वाण फुले कावेरी (पी.टी.11-4) हा देशाच्या दक्षिण विभागातील तामिळनाडु, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि ओडीशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत तसेच बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 15.91 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 24.00 क्विंटल इतकी आहे. प्रचलीत वाण फुले राजेश्वरी या वाणापेक्षा या वाणाने 22.86 टक्के अधिक उत्पादन दिलेले आहे. या वाणाचा पक्वता कालावधी 164 दिवस आहे. या वाणाचे फिकट तपकिरी रंगाचे अधिक टपोरे दाणे असून 100 दाण्यांचे वजन 11.52 ग्रॅम आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक असून शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा सुध्दा कमी प्रार्दुभाव दिसून आला.
तीळ या पिकाचा जे.एल.टी. 408-2 (फुले पूर्णा) हा वाण महाराष्ट्रातील खान्देश आणि मराठवाडा विभागातील उन्हाळी हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला आहे. याचे उत्पादन 705 किलो प्रति हेक्टर असून यामध्ये तेलाचे प्रमाण 49 टक्के आहे. याचा एकुण पक्वता कालावधी 95 ते 100 दिवसांचा असून 1000 दाण्यांचे वजन 4 ग्रॅम इतके आहे. हा वाण पानावरील ठिपके व पुर्णगुच्छ रोगासाठी प्रतिकारक असून पाने गुंडाळणारी अळी व फळ पोखरणार्या अळीसाठी सहनशील आहे. उडदाचा पियु 0609-43 (फुले वसु) हा वाण महाराष्ट्रातील उडीद पिकवणार्या भागासाठी प्रसारीत करण्यात आला असून या वाणाची अधिकतम उत्पादनक्षमता 19 क्विं./हे. आहे. या वाणाचा टपोरा दाना असून 100 दाण्याचे वजन 4.87 ग्रॅम आहे. हा वाण भुरी व पिवळा विषाणू या रोगास प्रतिकारक्षम असून याचा परिपक्वता कालावधी 73 दिवसांचा आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संशोधन संचालक व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोल्याचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व विद्यमान संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, डॉ. रामदास गारकर, गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके, ज्वारी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दिपक दुधाडे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे व जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे डॉ. संजीव पाटील, डॉ. सुमेरसिंग राजपूत यांच्यासह पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, निफाड येथील कृषि संशोधन केंद्र, ज्वारी सुधार प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प व तेलबिया संशोधन केंद्रातील सहकार्यांनी या वाणांसाठी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button