कृषी

अन्न आणि आरोग्यसेवा ही आपल्या देशाची बलस्थाने- अनिल बोकील

महात्मा फुले कृषि विद्यापीठात एमपीकेव्ही क्लायमेक्स – 2022 चा समारोप

राहुरी विद्यापीठ : पूर्वी आपल्या देशात बारा बलुतेदार पध्दत होती. त्यावेळी आपला देश सुजलाम सुफलाम होता. व्यवहारात वस्तुच्या व सेवेच्या बदल्यात धान्य दिले जायचे. आता व्यवहार नोटांमध्ये होतात, त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आहे. आपला देश जैव विविधतेने फार समृध्द आहे. त्यामुळे अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण होऊन आपण जगाला अन्नधान्य पुरवत आहोत. या बदलत्या हवामानात व औद्योगीक क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे बाहेरच्या देशांचे आरोग्य आणि अर्थव्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. चायनाने व्हायरस दिला त्यावर आपण व्हॅकसीन दिली. चायनाने युध्द दिले तर आपण जगाला बुध्द दिले. आपल्या नैसर्गिक संपत्तीमुळे अन्न, आरोग्यसेवा ही आपल्या देशाची बलस्थाने झालेली आहेत. या जोरावर आपण भविष्यात जगावर राज्य करणार आहोत असे प्रतिपादन पुणे येथील थिंक टँक अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नाहेप-कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स -2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बोकील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भाकृअप, कास्ट-नाहेपच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल, नाबार्डचे जनरल मॅनेजर सुब्रत कुमार नंदा, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. जयप्रकाश गायकवाड व संयोजन सचिव डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की, शेतीमुळेच आपल्या देशाचे भविष्य उज्वल आहे. हे लॉकडाऊनच्या काळात अधोरेखीत झालेले आहे. आता शेती आणि शेती शिक्षणाला समाजात महत्व प्राप्त होत आहे. केंद्र व राज्य शासनाने बनविलेल्या शेती विषयक योजना प्रगतीकडे नेणार्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाला अन्नधान्याचा पुरवठा करण्याची ताकद भारताच्या कृषि क्षेत्रामध्ये आहे. विद्यापीठातून मिळणार्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्यांच्या हितासाठी करावा. डॉ. अनुराधा अग्रवाल म्हणाल्या भारताची अर्थव्यवस्था ही कृषिवर अवलंबुन आहे. यामुळे आता प्राथमिक शिक्षणामध्ये कृषिच्या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. देशाची कृषि शिवाय प्रगती नाही ही जाण धरुन शालेय विद्यार्थ्यांनी कृषि विषयामध्ये आवड निर्माण करावी. आंतराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पध्दतीच्या धोरणानुसार आपल्या देशातील शिक्षणामध्ये 40 टक्के ऑनलाईन व 60 टक्के ऑफलाईन शिक्षण असण्यासंबंधीचे धोरण तयार करण्यात येत आहे. सुब्रत कुमार नंदा आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा अन्नधान्यामध्ये स्वयंःपूर्ण झालेला आहे. या अन्नधान्यातून अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी मुल्यवर्धनाची जोड देणे आवश्यक आहे. नाबार्डमार्फत विविध योजनांतर्गत मुल्यवर्धनाला प्राध्यान्याने अर्थसहाय्य दिले जात आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी या एमपीकेव्ही क्लायमेक्स कार्यक्रमाच्या उपलब्धीविषयीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले रोजगार मेळाव्यामध्ये 75 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. शिक्षण व संशोधनासाठी राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. शेतीमधील ड्रोन पायलट ट्रेनिंग संदर्भात शेतकर्यांमध्ये व तरुणांमध्ये जनजागृती झाली. एमपीकेव्ही क्लायमेक्स मधील रोजगार मेळावा, शिक्षण मेळावा व कृषि प्रदर्शनाचा आढावा डॉ. मुकुंद शिंदे यांनी सादर केला. यावेळी एमपीकेव्ही क्लायमेक्स या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ व कास्ट प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांचा कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृषि उद्योजक आयडॉल्स व शेतकरी आयडॉल्स यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ड्रोन पायलट ट्रनिंग सेंटरचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे, डॉ. सुनिल कदम, मुंबई येथील ग्राउंड झीरो एरोस्पेसचे राहुल आंबेगावकर व ध्रिती शहा यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन डॉ. रवी आंधळे यांनी तर सूत्रसंचालन कु. सायली बिरादार हिने केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातून विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button