अहिल्यानगर
कै.कॉ.रामदास पाटील बांद्रे: मानवतेचे पुजारी
” जो आपल्या भूमीचा अभिमान बाळगतो,
…. तो माणूस
ज्याचा अभिमान त्या भूमीला वाटतो,
.. तो देवमाणूस “
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेले मानवतावादी अब्राहम लिंकन यांचे वरील वाक्य सार्थक करणारे कै.रामदास उर्फ नारायणराव कारभारी पाटील बांद्रे होय. उंदीरगावसारख्या खेड्यातील हे व्यक्तिमत्व म्हणजे माणुसकीचे नंदनवन होते. 01मार्च 1930रोजी जन्म झालेले रामदास पाटील बांद्रे यांचे रविवार दि. 17ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी निधन झाले, आणि जनमन शोकमग्न झाले. 91वर्षाचे त्यांचं जीवनचरित्र म्हणजे एक सेवाभावी इतिहासाचे सुवर्णपान आहे.
“माणूस किती जगला, यापेक्षा तो कसा जगला”
हे जीवनसूत्र फार महत्वाचे आहे.
आई हौसाबाई आणि वडील कारभारी पाटील बांद्रे यांच्या सुसंस्काराचे बाळकडू मिळालेल्या रामदास पाटील बांद्रे यांनी शेती आणि जनसेवेला अधिक प्राधान्य दिले, त्यांचे चौथीपर्यंत उंदीरगावी शिक्षण झाले. घर आणि समाज हेच त्यांच्या जीवन वाटचालीचे मंदिर होते. जसे संत गाडगेबाबा कधी देवळात गेले नाहीत पण देवासमान माणसांची त्यांनी फकिरी पत्करून सेवा केली. गाडगेबाबा लोकांना म्हणत, कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणाचे काम करतात तेच खरे देव आहेत, त्यांना मदत करा, त्यांच्या शिक्षण कार्याला मदत करा. महात्मा गांधी यांनी केवळ पंचा वापरून, फिकीरी पतकरून जनसेवा केली. आदर्श राज्यकर्ते साधेपणा स्वीकारून, आपण ह्या देशाचे रखवालदार आहोत अशी नम्रता आणि साधुत्व स्वीकारून देशसेवा करतात. श्रीराम, सीतामातेने, लक्ष्मणाने सत्तेपेक्षा वनवास स्वीकारला, तसे रामदास पाटील बांद्रे यांनी कॉम्रेड सारख्या गोरगरिबांचे विचार करणारे राजकीय तत्वज्ञान स्वीकारले जेव्हा काहींनी सत्तेचे मार्ग स्वीकारले तेव्हा रामदास पाटील बांद्रे निष्ठा ठेऊन जीवनाची फकिरी पत्करून आपलं जीवन सामाजिक न्यायासाठी समर्पित केले. कोठेही अन्याय घडला की ते धावून जात असत. 1972चा दुष्काळ आणि माणसाची जगण्याची अवस्था त्यांनी पाहिली, उपाशी माणसासाठी ते धावून जात होते, एकदा रेशन दुकानासमोर गोरगरीब माणसांची भली मोठी रांग होती. पण दुकानदाराने अहंकाराने आपल्या दुकानाला कुलूप लावले, हे पाहून रामदास पाटील बांद्रे यांना संताप आला, “माणसं दुष्काळात भुकेने होरपळून मरताहेत आणि तू दुकान बंद करतोस? ” असे म्हणून त्यांनी रागाने रेशन दुकानाचे कुलूप तोडले आणि स्वतः पुढे होत गोगरिबांना धान्य दिले. उपाशी जनतेने त्यांचा जयजयकार केला. माणसात देव शोधणारे रामदास पाटील बांद्रे हे पुरोगामी विचारांचे द्रष्ठे समाजसेवक होते.
रामदास पाटील बांद्रे यांचे नाव उच्चारले की शेती, शेतकरी आणि खंडकरी चळवळीचे नेतृत्व समोर येते. खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी 1952मध्ये माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कॉम्रेड अड,पी.बी. कडू पाटील, अण्णासाहेब पाटील थोरात यांच्या साथीने खंडकरी चळवळ उभी केली. ही चळवळ महाराष्ट्र पातळीवर दिशादर्शक ठरली, या चळवळीचे परिणाम सर्वत्र झाले. या चळवळीसाठी रामदास पाटील बांद्रे यांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. सतत संघर्ष करीत शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी त्यांना मिळवून दिल्या. स्वतःची एक गुंठाही जमीन या संदर्भाने नसताना ते फक्त आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढत राहिले. जोपर्यन्त खंडकरी लोकांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत दाढी करणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि ती त्यांनी खरी करून दाखविली. खंडकऱ्यांचा प्रश्न सुटला मगच त्यांनी दाढी केल्याचा इतिहास हा ताजाच आहे. खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे सातबाराचे उतारे मुख्यमंत्र्याचे हस्ते मिळाल्याचा त्यांना मोठा आनंद वाटला. ठरल्याप्रमाणे त्यादिवशी त्यांनी सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी केली. केवढी ही निष्ठा आणि भीष्मप्रतिज्ञा आहे, हे फक्त महापुरुषच करू शकतो.
कॉ.रामदास पाटील बांद्रे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण कार्याला वाहून घेतले होते, ते कर्मवीरासारखेच दिसत असत,ते बाणेदारपणे बोलत असत, त्यांचा धाडशी स्वभाव आणि न्यायप्रियता हे कर्मवीराप्रमाणेच होते. त्यांची अनेक भाषणे आम्ही ऐकली आहेत. त्यांच्या सहवासात मला सतत माणुसकीचा देव दिसत असे. गावात कारभारी नावाचा एक वेडा होता, त्याच्यासाठी ते आधार होते. त्याला आंघोळ घालीत, जेवायला देत, स्वतःजवळ बसवून घेत असत, गोरगरीब, दीनदलित, दुर्लक्षित माणसांचे ते देवच होते. माझ्या पोरक्या अवस्थेत त्यांनी मला खूप मदत केली, माझ्याविषयी लोकांना ते भरभरून सांगत असत, “अरे त्या पोरक्या पोरानं काबाडकष्ट करीत शिक्षण घेतलं, तो प्राध्यापक झाला, लेखक झाला, त्याचा आदर्श घ्या ” असे मुलांना, लोकांना सांगत असत, माझ्यावर त्यांनी अपार माया केली. त्यांच्या जाण्याने मी व्याकुळ आहे, अशी माणसं हीच माझी श्रद्धास्थाने आहेत. त्यांचा मदतीचा आणि कौतुकाचा हात मला दयाळू आणि बहुजनप्रेमी श्रीकृष्णप्रमाणे वाटत असे. त्यांच्या भेटीत मला सतत कर्मवीरअण्णा दिसले, उंदीरगावच्या शेतमळ्यात मी त्यांच्या भेटीसाठी जात असे. संपूर्ण बांद्रेकुटुंब मला पूजनीय आहे. त्यांची पत्नी शकुंतलाबाई यांचे आशीर्वाद लाभले. त्यांचे सुपूत्र योगेश माझे प्रिय मित्र आहेत. त्यांच्या कन्या सौ.अनिता अशोकराव नांदे ह्या बोरावके महाविद्यालयात एक आदर्श, विद्यार्थप्रिय, रयतनिष्ठ, कर्मवीर विचारांनी युक्त प्राध्यापिका आहेत. आम्ही बोरावके कॉलेजमध्ये एकत्र अध्यापन केले, या परिवाराचा कृपाप्रसाद मला लाभला. रामदास पाटील बांद्रे यांच्या मुली त्यांच्याप्रमाणेच माणुसकी संपन्न आहेत. ॲड पुष्पाताई बाळासाहेब कडू, सौ.इंदुमती वसंतराव पिंपळे, सौ.सुनीताताई भास्करराव लांडगे, जावई, नातवंडे, पतवंडे असा हा मोठा परिवार आदर्शरूप आहे.
“शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी “
याचा प्रत्यय अगदी सहजपणे त्यांच्या वागण्यातून येतो.कवी कुसुमाग्रज यांनी एके ठिकाणी लिहिले आहे,
” गगनपरी जगावे
मेघापरी मरावे
तीरावरी नदीच्या
गवतातून उरावे “
कॉम्रेड कै.रामदास उर्फ नारायणराव कारभारी पाटील बांद्रे यांचे सेवाशील जीवन माणसांच्या मनामनात सुगन्धितपणे उरले आहे,
“दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती ” कॉ.रामदास पाटील बांद्रे यांच्या चरणी ही भावफुले मी समर्पित करतो.
डॉ. बाबुराव उपाध्ये,इंदिरानगर, श्रीरामपूर भ्रमणभाष 9270087640