कृषी
मृदा विज्ञान वार्षिक कार्यशाळेत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मृदा विज्ञान सोसायटीच्या 86 व्या वार्षिक अधिवेशनादरम्यान शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ होते. कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, मृदा विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठातील शास्त्रज्ञ व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्प अंतर्गत सहभागी गावे चिंचविहिरे, कणगर, तांभेरे व कानडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले व शेतकर्यांच्या शकांचे निरसन केले. जमिनीमधील सूक्ष्मजीवांचे महत्त्व व त्यांच्याद्वारे केले जाणार्या कार्याबद्दल डॉ. तानाजी नरुटे यांनी मार्गदर्शन केले. जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर डॉ. अनिल दुरगुडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये निचर्याचे महत्त्व व जमिनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी करावयाचे उपाय सांगितले. ऊसातील पाचट व्यवस्थापन या विषयावर डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी मार्गदर्शन केले. उसामधील पाचटाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे व जमिनीचा सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीने वाढवला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
गांडूळ खत निर्मितीबाबत डॉ. महेंद्र मोटे यांनी मार्गदर्शन केले. गांडूळाच्या विविध प्रजाती तसेच गांडूळ तयार करण्याच्या पद्धती याबद्दल त्यांनी शेतकर्यांना अवगत केले. सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. उल्हास सुर्वे यांनी सांगितले सजीवांनी सजीवांसाठी केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती करण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. पाण्याच्या अतिवापरामुळे व निचर्याची व्यवस्था नसल्यामुळे ज्या जमिनी क्षारयुक्त होत आहे त्यांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले पाहिजे याबद्दल डॉ. रावसाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले.
मृदा व जलसंधारण या विषयावर डॉ. विजय अमृतसागर यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांचा कशाप्रकारे सामाजिक व आर्थिक विकास झाला याबद्दल डॉ. पंडित खर्डे यांनी मार्गदर्शन केले. कनेक्टिंग फार्मर ग्रुपचे राकेश शर्मा यांनी उसापासून तयार होणारे विविध पदार्थ व त्याचे विक्री व्यवस्थापन याविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संकलक म्हणुन डॉ. आनंद जाधव यांनी काम पाहिले. उपस्थित शेतकर्यांसाठी डॉ. नानासाहेब पवार सभागृह याठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभय पाटील व आभार प्रदर्शन डॉ. सचिन सदाफळ यांनी केले. या कार्यक्रमाला कृषिभूषण श्री. सुरसिंग पवार, कृषि विद्या विभागाचे प्रमुख डॉ. आनंद सोळंके व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.