ठळक बातम्या
चोरीला गेलेल्या दुचाकीधारकास नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेश, पुणे ग्राहक मंचाचा महत्वपूर्ण निकाल
बाळकृष्ण भोसले | राहुरी : चोरीला गेलेल्या दुचाकीची ३७ हजाराची नुकसान भरपाई तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून ९ टक्के व्याजाने द्यावी असा महत्वपूर्ण आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, संगिता देशमुख यांनी हा निकाल दिला.
याबाबत राहुरी तालुक्यातील मुळ रहिवासी व हल्ली चंदननगर (पुणे) येथे स्थायिक असलेले जितेंद्र भास्कर पवार यांनी विमा कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार श्री पवार यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी दुचाकी खरेदी केली होती. त्या दुचाकीचा विमा आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीकडून उतरविण्यात आला होता. ६ ऑगस्ट २०१८ रोजी तक्ररदार श्री पवार यांची दुचाकी चोरीला गेली. त्याबाबत त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गाडीची सर्व रक्कम ५० हजार २९६ रूपये १० टक्के व्याजाने तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून विमा कंपनीकडून मिळावी असा दावा केला होता. तक्रारदाराची तक्रार दिवाणी न्यायालयात चालण्यास योग्य आहे. तसेच तक्रार करण्यास काय कारण घडले हे तक्रारदार यांनी स्पष्ट केले नाही असे कारण देत दावा फेटाळण्याची विनंती विमा कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र हा युक्तिवाद ग्राहक आयोगाने फेटाळत ३७ हजार रूपये नुकसान भरपाई आणि ५ हजार रूपये तक्रार खर्च देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला आहे.
वाहनाची चोरी झाल्यास व तक्रारदाराकडून एखाद्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाले असेल तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विमा कंपनी विम्याचा दावा नामंजूर करू शकत नाही. त्यामुळे तक्रारदार हे नाॅन स्टॅण्डर्ड बेसीसवर दुचाकीच्या किमतीच्या ७५ टक्के रक्कम मिळण्यास आणि तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत असे आयोगाने निकालात नमुद केले आहे.
दरम्यान या निकालामुळे विमा करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याच्या नावाखाली विम्याचा दावा नाकारत असलेल्या विमा कंपन्यांना आता चाप बसणार आहे.