छत्रपती संभाजीनगर
गोविंदभाई श्रॉफ यांची पुण्यतिथी साजरी
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत थोर स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, पर्यवेक्षिका राजश्री देशपांडे यांच्या हस्ते गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. गोविंदभाई श्रॉफ यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या फोटो अल्बमचे विमोचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाईंच्या जीवनावर आधारित स्वरचित कविता सादर केल्या. यानिमित्ताने गोविंदभाई श्रॉफ यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यास्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भाईंच्या जीवनकार्याचा भाषणातून अभ्यासपूर्ण मांडणी करीत आढावा घेतला.
प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, सहशिक्षक विजय पचलुरे यांनी भाईंच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे केली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य यांनी केला. या कार्यक्रमाचे संयोजन श्यामल मेश्राम यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.