छत्रपती संभाजीनगर
पुलाचा भाग खचल्याने ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला; ढोरकीन नजीकची घटना, सुदैवाने जीवितहानी टळली
विलास लाटे | पैठण : औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील ढोरकीन नजीक असलेल्या पंप हाऊस जवळील एका अरुंद पुलावर रविवारी (दि.२०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना पुलाच्या कठड्यासह पुलाचा काही भाग खचल्याने ऊसाने भरलेल्या दोन ट्रेलर नदीत उलटल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. या घटनेनंतर अरुंद जुनाट जीर्ण पुल व रस्त्याविषयी लोकप्रतिनिधी विरोधात नागरीकांसह वाहनधारकांतून नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसून आले.
पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. दरम्यान या वर्दळीच्या रस्त्यावर ढोरकीन नजीक पंप हाऊस जवळील एका अरुंद पुलावरून रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ऊसाने भरलेल्या दोन ट्रेलर घेऊन कन्नड येथील साखर कारखान्यात जात होता. पुलावरून जात असताना ट्रक्टरमध्ये असलेल्या ऊसाच्या जादा वजनाने पुलाच्या कठड्यासह पुलाचा कठड्यानजीकचा भाग खचल्याने ऊसाने भरलेल्या दोन ट्रेलर नदीत उलटल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. हा ट्रेलर व ऊस नदीत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली.
या पुलाच्या पुढे वळण असल्याने रात्रीला अनेकदा वाहनधारकांना याचा अंदाज येत नाही. त्यात हा पुल अरुंद असल्याने या पुलावर अनेकदा छोट्या मोठ्या घटना सतत घडत असतात. घटनेनंतर जमलेल्या जमावातुन लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी अरुंद रस्ता व त्यावरील अरुंद पुलावरून लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणा याला जबाबदार असल्याचा आरोप करत निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले.
या रस्त्यावर या पुलासह कारकीन फाटा, ढोरकीन येथील जुने एमएसईबी कार्यालय, ढोरकीन गावातील राजाबागसवार दर्गा, टाकळी फाट्यानजीक, धनगाव नजीक असलेल्या अशा अनेक छोट्या मोठ्या पुलांची दुरावस्था झाली आहे. हि सर्वच पुले जुनाट असून ती जीर्ण झाली आहे. काही पुलांची कठडेही तुटलेली आहे. अशा या धोकादायक पुलावरून वाहन धारकांना जीव मुठीत प्रवास करावा लागतो. नागरीकांच्या जीवाशी खेळणे थांबवून तातडीने या रस्त्यासह पुलांचे रुंदीकरण व नुतनीकरण करण्याची मागणी या घटनेनंतर पुन्हा वाहनधारकांसह नागरीकांतून जोर धरू लागली आहे.