कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व इकोसर्ट, फ्रान्स सोबत सामंजस्य करार

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महाराष्ट्र शासनाने सन 2018- 19 पासून 18.20 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून या प्रकल्पामध्ये विविध सेंद्रिय फळबागा, भाजीपाला, सेंद्रिय रस व गुळासाठी उसाचे नवीन वाणांचा प्रतिसाद, देशी वाणांचे दुर्गम भागातून संकलन व त्यांच्या सेंद्रिय शेतीसाठी प्रतिसाद, विविध सेंद्रिय खते व द्रावणांचे प्रयोग, उत्कृष्ट गांडूळ खत निर्मिती व कंपोस्ट खते तयार करण्यासाठी विविध द्रावणांचा वापर, जमीन सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतांचे प्रयोग तसेच सोयाबीन, तूर, कांदा, हरभरा व गहू यांचे सेंद्रिय बीज उत्पादन घेण्यात येत आहे.
सेंद्रिय प्रमाणिकरण या विषयावरील एक वर्ष कालावधीचा आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सेंद्रिय शेती प्रमाणीकरणातील नामांकित इकोसर्ट, फ्रान्स यांचेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर राहुरी कृषि विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील तसेच इकोसर्ट कंपनीतर्फे श्रीमती. अग्निस पाक्वीन व इकोसर्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जाधव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या एक वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कृषि फलोत्पादन/ कृषि व विक्री /कृषि अभियांत्रिकी/ जैवतंत्रज्ञान/ अन्न तंत्रज्ञान/ दुग्ध तंत्रज्ञान/कृषि उद्योग व्यवस्थापन तसेच कृषि व कृषि आधारित पदवी व्यतिरिक्त विज्ञान शाखेतील पदवीधारक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. या अभ्यासक्रमाचे माध्यम इंग्रजी असून हा अभ्यासक्रम नोव्हेंबर, 2022 पासून मध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सुरू करण्यात येईल. या एक वर्ष निवासी अभ्यासक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञ तसेच इकोसर्ट, फ्रान्स येथील तज्ञ या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतील.
या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशभरातील विविध सेंद्रिय  प्रमाणीकरण संस्था / कंपनीची माहिती होईल तसेच 2022 ते 2023 पासून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सेंद्रिय प्रामाणिकरण संस्थेची निर्मिती केलेली आहे. यामध्ये युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. त्यातच केंद्र सरकार व राज्य सरकार सेंद्रिय / नैसर्गिक शेती यावर ठोस पावले उचलत आहे. या सामंजस्य करारावेळी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषीविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळुंके, कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी तथा जलसिंचन व पाणी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने, तंत्र अधिकारी डॉ. रवी आंधळे, कृषीविद्या विभागाचे प्राध्यापक तथा एकात्मिक शेती पद्धती व सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button