निधन वार्ता
कै. काशिनाथ पाटील हरिश्चंद्रे यांचे दुःखद निधन
कै.श्री.काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांचे सारखे आदर्श सरपंच खडांबे गावाला पुनः होणे नाही; त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ..!!
राहुरी : तालक्यातील खडांबे खुर्द ग्रामपंचायत चे माजी सरपंच काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांचे शुक्रवार ता.२१ ऑक्टोबर रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. खडांबे खुर्द गावातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत आपल्या सामाजिक कार्याने ते लोकप्रिय होते.
खडांबे खुर्द गावाचा जवळपास ३० ते ३५ वर्ष त्यांनी सरपंच पदाचा कार्यभार अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे सांभाळला. प्रसंगी आपल्या संसाराकडे त्यांनी दुर्लक्ष करून गावचा विकास हा एकच ध्यास त्यांच्या मनात होता. सरपंच पदी विराजमान असताना देखील भल्या पहाटे गावातील पिण्याचे आणि वापराचे पाणी पुरवठा स्वतः चालु वा बंद करत होते. असे एक ना अनेक कामे ते स्वतः करत होते. ते कधीच कोणत्या कर्मचाऱ्याची वाट पाहत बसत नव्हते. म्हणूनच संपुर्ण परिसरात त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाल्याने आजही प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा असे हे व्यक्तिमत्त्व होते.
ते स्वर्गवासी झालेले असले तरी देखील आजही सामाजिक कार्याने ते लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मानात एक वेगळीच ओळख निर्माण करून गेलेले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कोणत्याही स्तरावरचे काम असो ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या माध्यमातुन निःस्वार्थ मार्गी लावत असत आणि नेहमीच गोरगरीब जनतेला न्याय देण्याची प्रमुख भूमिकाही पहिल्या पासूनच नव्हे तर शेवटपर्यंत होती. म्हणुनच की काय अंत्यविधी करीता देखील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऐन दिवाळीच्या काळात त्यांना देवाज्ञा झाल्याने गावातील हरिश्चंद्रे परिवाराबरोबरच संपूर्ण पंचक्रोशीतील जनमानसात एक दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, मुलगी, जावई, तीन भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवार ता. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ७:०० वाजता खडांबे खुर्द येथील अमरधाम या ठिकाणी होणार असून ह.भ.प. भागवत महाराज जंगले (डोंगरगण) यांचे प्रवचन होणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.