कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे तुरीचे फुले तृप्ती व फुले कावेरी हे वाण राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी अधिसूचित
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेले तुरीचे फुले तृप्ती व फुले कावेरी हे वाण राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आले आहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या 89 व्या बैठकीत हे वाण अधिसूचित करण्यात आले.
महाराष्ट्रात खरीप हंगामातील तूर हे महत्वाचे पीक असून या पिकाखाली महाराष्ट्रातील 12.36 लक्ष हेक्टर क्षेत्र असुन 12.52 लक्ष टन उत्पादन मिळते तर उत्पादकता 1013 किलो/प्रती हेक्टर आहे. तूर पिकामध्ये अधिक उत्पादनक्षम व लवकर पक्व होणारे आणि मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम असणार्या वाणांची निर्मितीच्या दृष्टीने सुरु असलेल्या संशोधनाचे हे दोन्ही वाण फलीत आहे. हे वाण नीम-गरवे (मध्यम कालावधी) प्रकारातील असून अधिक उत्पादनक्षम आहेत. फुले तृप्ती (पी.टी.10-1) हा वाण देशाच्या मध्य विभागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत/बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 22.66 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 32.00 क्विंटल इतकी आहे. प्रचलीत वाण फुले राजेश्वरी आणि बी.डी.एन.-711 या वाणांपेक्षा या वाणांने अनुक्रमे 33.45 टक्के आणि 42.97 टक्के अधिक उत्पादन दिलेले आहे. या वाणाचा पक्वता कालावधी 165 दिवस आहे. या वाणाचे फिकट तपकिरी रंगाचे टपोरे दाणे असुन 100 दाण्यांचे वजन 10.81 ग्रॅम आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक असुन शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा कमी प्रार्दुभाव दिसून आला.
फुले कावेरी (पी.टी.11-4) हा वाण देशाच्या दक्षिण विभागातील तामिळनाडु, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि ओडीशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत/बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 15.91 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी 24.00 क्विंटल इतकी आहे. प्रचलीत वाण फुले राजेश्वरी या वाणांपेक्षा या वाणांने 22.86 टक्के अधिक उत्पादन दिलेले आहे. या वाणाचा पक्वता कालावधी 164 दिवस आहे. या वाणाचे फिकट तपकिरी रंगाचे अधिक टपोरे दाणे असून 100 दाण्यांचे वजन 11.52 ग्रॅम आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक असून शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा सुध्दा कमी प्रार्दुभाव दिसून आला. या वाणांच्या निर्मितीमध्ये पीक पैदासकार डॉ. एन.एस. कुटे, डॉ. व्हि.एम. कुलकर्णी, श्री. वाय. आर. पवार, रोगशास्त्रज्ञ डॉ. व्हि.ए. चव्हाण, किटकशास्त्रज्ञ डॉ. सी.बी. वायळ यांचे मोलाचे योगदान लाभले. याकरीता कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, तत्कालीन संशोधन संचालक डॉ. शरद गडाख तसेच विद्यमान संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि आखिल भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपुर येथील तुर संशोधन प्रकल्पाचे सन्मवयक डॉ. इंद्रप्रकाश सिंग यांची प्रेरणा आाणि मार्गदर्शन लाभले.