अहिल्यानगर
पवित्र मरीयाच्या सामर्थ्याची शक्ती प्रेरणा देणारी- फा.संजय पारखे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरिगाव मतमाउली यात्रापूर्व पाचवे पुष्प औरंगाबाद, फा.संजय पारखे यांनी “मानवाच्या तारणातील प.मरीयेचे मध्यस्थीचे महत्व”या विषयावर प्रवचन करताना सांगितले की, आजची भक्तीमध्ये मानवाच्या तारणामध्ये पवित्र मरीयेच्या मध्यस्थीचे महत्व या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. पवित्र मरीयेला देवाने निवडून घेतले आणि तिच्यावर कृपेचा वर्षाव केला आणि तिला आपल्या तारण कार्यामध्ये सहभागी करून घेतले. निष्कलंक मारीयेच्या व्दारे या जगामध्ये एक मध्यस्थ आपल्यासाठी पाठविला. ज्याने आपल्याला तारणाचा मार्ग दाखविला.
ज्यावेळेस परमेश्वराने प.मारीयेची निवड केली गाब्रीयल तिचा देवदूत तिच्याकडे येऊन नमन करून म्हणाला की, प्रभू तुझ्या बरोबर आहे. याचाच अर्थ आहे की, पवित्र मरीयेचे आणि देवाचे सुंदर असे नाते अलौकिक आहे आणि प्रत्येक जणाला आपण म्हणू शकत नाही की प्रभू तुझ्या बरोबर आहे. परंतु परमेश्वराची कृपा तिच्यावर संपूर्णपणे होती व प्रभू तिच्या बरोबर होता. परमेश्वराशी तिचे एक विशिष्ट नाते आहे. तसे नाते असले तरच आपण दुसऱ्यासाठी मध्यस्थी करू शकतो. जशी लग्नामध्ये करू शकतो. ज्या ठिकाणी दुरावा असतो तो मिटवण्याचा प्रयत्न करत असतो. मध्यस्थाचे काम प.मरीयेने याच व्दारे केले आहे. तिने देवाची जी संतती आहे. पापामुळे देवापासून दूर गेली होती तर तिला देवाच्या मध्यस्थीने देवाजवळ आणले. प.मरीयेने देवाला होकार देऊन तिच्या होकाराव्दारे, आज्ञा पालनाव्दारे तिने आपल्यासाठी तारण मिळवून दिले.
प.मरिया ही पहिली व्यक्ती आहे जी आपल्याला देवाकडे वळवते व तिच्या मध्यस्थीव्दारे आपले तारण घडवून आणते. प्रभूने आपल्यावर कृपा केली तो आपल्या सर्वावर प्रेम करतो. आपल्या सुखामध्ये दु:खामध्ये आपल्या बरोबर आहे. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. त्याचेमुळे प्रभू येशूला परमेश्वराच्या दैवी कृपेचा चेहरा असे म्हणतात. याच चेहऱ्याचे प्रतिबिंब प.मरीयेमध्ये सुद्धा पहातो प. मरिया सुद्धा देवाची आई व दैवी दयेची आई आहे. तिच्या दैवी दयेव्दारे जगाचे तारण घडवून आणले. तिच्या दैवी दयेच्या मध्यस्थीव्दारे प्रभू येशू जन्माला आला. तिच्या दयेव्दारे, करुणाव्दारे आपण परमेश्वरच्या अजून जवळ येतो. कान्हा गावी लग्नाच्या वेळेस प.मरिया हजर होती.
संत योहानाने म्हटले नाही की येशू त्या ठिकाणी उपस्थीत होता. पण येशुची आई तेथे होती याचा अर्थ प.मरीयेचे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची शक्ती ही जगाला दाखवून दिली आहे. प.मरिया येशूकडे विनंती करते व येशूला पहिल्या वेळेस चमत्कार करण्यास भाग पाडते. तिच्या बळावर सेवकांना सांगते की हा जे तुम्हाला काही सांगेल ते करा व तिने ही मध्यस्थी तेथे घडवून आणली. आपला परमेश्वर आपल्याला दु:खामध्ये तारण प्रदान करतो. आपल्या जवळ येतो संबंध प्रस्थापित करतो. त्याच प्रकारचे संबंध प.मरिया हि तिच्या मध्यस्थीव्दारे स्थापन करीत आहे.
आजच्या नोव्हेनामध्ये श्रीरामपूर येथील धर्मगुरू संपत बोरसे, हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक, सचिन रिचर्ड आदी सहभागी होते. शिक्षक दिन असल्याने सर्व शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी समवेत शिक्षकांची मिरवणूक काढण्यात आली. दि ६ सप्टेंबर रोजी फा फ्रान्सिस ओहोळ राहाता यांचे सांत्वनकर्ती नित्य सहाय्यक माता मरिया या विषयावर प्रवचन होणार आहे.