अहिल्यानगर
हरिगाव मतमाउली यात्रेस सहा लाखांवर भाविकांची उपस्थिती
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे ७४ वा मतमाउली यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आनंदाने सहा लाखांवर सर्व धर्मीय भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यात्रादिनी सकाळी हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ यांच्या हस्ते व संजय पंडित, विलास सोनवणे आदी धर्मगुरू यांचे उपस्थितीत सकाळी मतमाउलीच्या शिरावर चांदीचा मुकुट चढवून पुष्पहार अर्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव असल्याने भाविकांना येता आले नाही. सकाळपासून हरिगाव फाटा ते चर्च पर्यंत पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची गर्दीच उसळली होती. दुपारी ४ वाजता नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांनी “पवित्र मरीयेच्या जन्माचा उद्देश, ध्येय या विषयवार सविस्तर मातेचा महिमा व जीवन यावर प्रवचन केले. त्यावेळी स्थानिक धर्मगुरू समवेत परिसरातील सर्व धर्मगुरू उपस्थित होते.
पावसाचा विचार करता भव्य मंडप उभारण्यात आला होता. या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्त्याने व चर्चपर्यंत विविध प्रकारची दुकाने हॉटेल्स थाटली होती. श्रीरामपूर फोटोग्राफर्स संघटना, दीपक तोरणे आदी अनेक मित्र मंडळ व संस्थांनी भाविकांना चहापाणी, नाश्ता, जेवण, फराळ आदीची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, नगर पालिका, महावितरण, एसटी महामंडळ ग्रामपंचायत उन्दिरगाव, हरिगाव आदींनी यात्रेकामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी आभार मानले.
सकाळी शुभारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष करण ससाणे, साई संस्थान विश्वस्त सचिन गुजर, कॉंग्रेस नेते हेमंत ओगले, बाबासाहेब दिघे, राजेंद्र पाउलबुद्धे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, आ.चंद्रशेखर कदम, श्रीरामपूर माजी नगरसेवक रईस जहागीरदार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यात्रेची संपूर्ण पाहणी केली. पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.