अहिल्यानगर

राहुरीत आदिवासी कुटूंबांना उषाताई तनपुरेंच्या हस्ते शिधापत्रिका व जातीच्या दाखल्याचे वाटप

राहुरी | बाळकृष्ण भोसले – शहरातील आदिवासी कुटुंबातील बांधवांना आज रविवारी शिधापत्रिका व जातीच्या दाखल्याचे वाटप माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग बर्डे हे होते. राहुरी शहरातील ७६ आदिवासी कुटुंबाना शिधापत्रिका व २५ आदिवासी व्यक्तींना जातीच्या दाखल्याचे वितरण आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
यावेळी बोलतांना डॉ. तनपुरे म्हणाल्या की माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आदिवासी विकास खात्याच्या माध्यमातुन मतदार संघातील अनेक आदिवासी बांधवांना शिधापत्रिका व जातीच्या दाखल्याचे वितरण केलेले आहे. राहुरी शहरातील आदिवासी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेऊन शिधा पत्रिका व जातीच्या दाखल्याच्या उपयोग आपल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी करण्याचे अवाहन केले.
पुढे तनपुरे म्हणाल्या की, आदिवासी कुटुंबातील व्यक्तींच्या जातीचा दाखला काढणेसाठी येणारी अडचणी अनेक असतात परंतु आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातुन हे दाखले तलाठी, तहसिलदार, प्रांतधिकारी, आदिवासी विकास अधिकारी यांचेबरोबर बैठका घेवुन मार्गी लावले असल्याचे सांगितले. या शिधापत्रिका व जातीच्या दाखल्यांचा उपयोग आपण पुढील पिढीतील मुला मुलींचे उच्च शिक्षणासाठी करुन आपल्या कुटुंबातील वंचित मुलामुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करावे. जेणेकरुन हि मुले मुली पुढे उच्च शिक्षीत होऊन समाजात आदर्श निर्माण करतील. यापुढेही आमदार तनपुरे यांचे माध्यमातुन तालुक्यातील व शहरातील आदिवासी कुटुंबाच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष देवु अशी ग्वाही सौ.तनपुरे यांना दिली.
यावेळी पांडुरंग बर्डे बोलतांना म्हणाले की, आमच्या आदिवासी बांधवांना जातीचे दाखले व शिधापत्रिका काढेसाठी अनंत अडचणी येतात. आज ७६ शिधापत्रिका व २५ जातीच्या दाखल्यांचे वितरण होतांना आनंद होत आहे. राहुरीतील आदिवासी कुटुंबाना पुढील उज्वल पिढीकरीता जातीचे दाखले व शिधापत्रिकेचे वाटप केल्याने आदिवासी कुटुंबाच्या चेह-यावर आज एक वेगळाच आनंद आहे. तनपुरे यांच्या माध्यमातुन आदिवासी कुटुंबाची पुढील पिढी नक्कीच उच्चशिक्षीत होऊन राहुरीचे नांव उज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महेश उदावंत, बाळासाहेब उंडे, लाभार्थी प्रतिनीधी सुरेश पवार, अंकुश पवार, प्रकाश माळी, विनोद माळी, विष्णु गायकवाड, बबन चव्हाण, सोमनाथ गायकवाड, सुवर्णा माळी, शितल जाधव, कांचन आहिरे, मंगल बर्डे, वैशाली बर्डे व इतर आदिवासी कुटुंब उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक नगराध्यक्ष अनिल कासार यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी मानले.

Related Articles

Back to top button