अहिल्यानगर
स्पर्धेच्या युगात तग धरायचा असेल तर बदलाशिवाय पर्याय नाही – माजी खा. तनपुरे
राहुरी | बाळकृष्ण भोसले – स्पर्धेच्या युगात तग धरायचा असेल तर बदल करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. संगणक युगाचा जास्तीत जास्त वापर करून स्पर्धेत उतरावे लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले
गुहा येथील प्रेरणा पतसंस्था व प्रेरणा मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे होते. देशातील वित्तीय संस्था राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका नागरी पतसंस्था यांचे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. ज्या संस्थांनी काळाच्या ओघात बदल केला, त्या संस्था आबादीत आहेत. मात्र ज्यांनी बदल स्वीकारले नाही त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी बदल करणे हे अत्यंत गरजेचे बनले आहे. प्रेरणा पतसंस्था व मल्टीस्टेटने काळाची पाऊले ओळखून बदल केल्याने संस्था नावारूपास आली आहे. संगणक युगात विविध सुविधा देण्याचे कार्य प्रेरणाने स्वीकारले व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक व संस्थेच्या माध्यमातून कारभार करणाऱ्या व्यापाऱ्यांना झाला आहे. ज्या दुचाकी चार चाकी वाहन कंपन्यांनी बदल केले नाही त्या काळाच्या ओघात बंद पडल्या. तसेच काही मोबाईल कंपन्यांचेही झाले आहे.
आजच्या तरुण पिढीने आपण कोणत्या मार्गाने जात आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रातही अनेक बदल झाले आहेत. याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे असे नमूद करून त्यांनी सद्यस्थितीवर आपले परखड विचार मांडले. सभेचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, संस्थेवर ग्राहकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संस्था चालविताना अनेक कसरती कराव्या लागतात. आर्थिक शिस्त न पाळल्याने काही संस्था बुडीत निघाल्या. त्यामुळे पतसंस्था चळवळ धोक्यात आली आहे. संस्थांना सावरण्यासाठी मल्टीस्टेट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. कारभार पाहिला जात आहे केवळ नफा मिळवणे हे उद्दिष्ट नसून पतसंस्था चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांना कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचा मानस होता, तो पूर्ण होत आहे.
पुणे जिल्हा व गोवा राज्य येथे मल्टीस्टेटची शाखा उघडल्या जाणार आहे. संस्थेने ग्राहकांसाठी विविध योजना आणून संस्था परिपूर्ण केली. ठेवींचा ओघ वाढतच आहे. राज्यभर संस्थेचे नाव पोहोचले. कालबाह्य योजना बंद केल्या. संस्थेने सुमारे 442 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी अनेक दुरुस्त्या केल्या, काही नियम पतसंस्थांना अडचणीचे ठरणारे आहेत. त्यासाठी विविध बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून त्यांनी पतसंस्था व मल्टीस्टेटच्या कारभाराचे सविस्तर वर्णन सभेपुढे मांडले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आले. जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे व अनिल वर्पे यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी कॉ गंगाधर जाधव, साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, के एम पानसरे, वसंतराव कोळसे, शिवाजीराव कोळसे, जालिंद्रर काळे, नारायण जाधव, व्दारकानाथ बडदे, प्रेरणा पतसंस्था व्हा. चेअरमन मच्छिंद्र हुरुळेे, प्रेरणा मल्टिस्टेट व्हा. चेअरमन विष्णुपंत वर्पेे, प्रेरणा सोसायटी व्हा. चेअरमन अशोक उर्हे व सर्व संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.