कृषी
शेतीसाठी ड्रोन हे क्रांती करणारे तंत्रज्ञान – केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी
राहुरी विद्यापीठ : भारतीय शेतीतील निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर कृषि क्षेत्रात करून शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, यामुळे शेतकर्यांची प्रगती व विकास होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व ॲग्रोव्हिजन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी ड्रोनचे महत्व या एकदिवसीय परिषदेत केंद्रिय मंत्री, रस्ते, वाहतुक आणि परिवहन, भारत सरकार ना. नितीन गडकरी बोलत होते. जागतिक बँक अर्थसहाय्यित, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत, हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतीसाठी ड्रोनचे महत्व या एकदिवसीय परिषदेचे आयोजन नागपुरातील वनामती सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेसाठी राज्यभरातील 300 हून अधिक शेतकरी, ड्रोन विक्रेते व निर्माते तसेच विविध कृषि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी मिस्त्रा, भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सौमिता बिस्वास, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, जितेंद्र गौर, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या कृषि पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. साहु, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे व ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर आदी उपस्थित होते.
ना. गडकरी पुढे म्हणाले की ड्रोनच्या वापरामुळे कृषि क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल. ड्रोनद्वारे फवारणीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था झालेली आहे. ड्रोन विकत घेऊन शेतकर्यांना उपलब्ध करून देण्याची योजना आखली जावी. पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून शेतकर्यांद्वारे निर्मित केलेल्या इथेनॉलचा वापर करण्याची गरज असून शेतीसाठी ड्रोनचा वापर करतांना बॅटरीऐवजी फ्लेक्स इंजिनचा वापर केला आणि हे इंजिन इथेनॉलवर चालले तर ड्रोनची आजची किंमत आणखी कमी होईल. इथेनॉलवर चालणारे इंजिन राहुरी कृषि विद्यापीठ विकसित करत असून त्यांना पाठबळ देऊ असेही त्यांनी नमूद केले.
ड्रोन हे कृषि क्षेत्रासाठी क्रांती करणारे तंत्रज्ञान आहे. ड्रोनचे महत्त्व शेतकर्यांना समजावून सांगण्याचा आपला नेहमी प्रयत्न आहे. ड्रोनच्या फवारणीमुळे 75 टक्के औषध व खत हे पिकाला मिळते आणि शेतकर्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होते, याकडेही श्री. गडकरी यांनी लक्ष वेधले. जनरेटर व ड्रोन इथेनॉलवर चालावे यासाठी माझा प्रयत्न आहे. ड्रोनप्रमाणेच हार्वेस्टरची योजनाही आखली जावी. यात 40 टक्के राज्य शासनाने व 25 टक्के केंद्र शासनाने अनुदान द्यावे. यामुळे उसाच्या शेतकर्यांसमोर असलेले संकट दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.
या परिषदेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. मुंकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. अविनाश गुलगुले, डॉ. वैभव मालुंजकर व डॉ. गिरीष भणगे यांनी नियोजन केले.