अहिल्यानगर
आई तुझ्या नावाने व्हावी नवी पहाट : लोककवी प्रशांत मोरे
राहुरी | बाळकृष्ण भोसले – आई संस्काराची खान असुन अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देऊन आई ची महती सांगण्याची संधी कानडे परिवाराने दिली आहे, आई चे ऋण या जन्मात फिटने शक्य नाही, त्यामुळे आई-वडिलांना आहे तोवर अंतर देऊ नये, जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे असे मत लोककवी प्रशांत मोरे यांनी व्यक्त केले.
खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट, व्हावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पहाट
स्व.लक्ष्मीबाई कडुभाऊ कानडे यांच्या आदरांजलीपर आईचा जागर या कवितांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली जेऊर हैबती येथे कानडे मळ्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, प्रा.दशरथ खोसे, भानुदास वाघमारे, कवी सुभाष सोनवणे उपस्थित होते. प्रा.मोरे यांनी श्रोत्यांशी संवाद साधत असताना आई व बापावरील अनेक कविता आई विषयाच्या अनेक आठवणी कवितांना जोडून सादर केल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.अशोक कानडे, जेलर रेवणनाथ कानडे व परिवाराने आयोजित केला होता. आईच्या आठवणींनी मंत्रमुग्ध होऊन श्रोते पाऊस सुरू असतानाही ऐकत होते, हा असा कार्यक्रम आगळा वेगळाच नव्हे तर श्रोत्यांना अगदी आईच्या आठवणीत बुडवून टाकणारा कार्यक्रम असल्यामुळे आयोजकांना देखील कार्यक्रम आयोजित करून आपण एक परिवर्तनासाठी योग्य पाऊल उचललं अशीच भावना सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. यावेळी माध्यमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुरेश मिसाळ, सुनील शेवाळे, दिगंबर रिंधे, आप्पा कांबळे, सुनील कानडे, अण्णा पाटील, संजय कानडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास अगरखं, किशोर गोरक्षनाथ कानडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केले. तर शेवटी सुनील गोसावी यांनी आभार मानले.