गुन्हे वार्ता

ट्रक चालकाला लुटणारे दोन जण एक दिवसाच्या आत अटकेत; पैठण एमआयडीसी पोलिसांची कारवाई

विलास लाटे | पैठण : तालुक्यातील कातपुर येथे पुलाचे काम चालू असल्यामुळे संथ गतीने चाललेला ट्रक अडवून ट्रकचालकाला चापट बुक्क्यांनी मारहाण करून मारण्याचा धाक दाखवून लुट करणाऱ्या दोघांना पैठण एमआयडीसी पोलीसांनी एक दिवसाच्या आत अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहजाद जमील मोहम्मद (वय ३०) रा. कमलापुरा उत्तरप्रदेश हा ट्रक चालक १२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक (युपी ३७ एटी ०२३५) हा ट्रक कातपुर येथून घेऊन जात असताना समोर पुलाचे काम चालू असल्यामुळे ट्रकची गती संथ होती. संथ गतीचा फायदा उठवत ट्रकला अडवून अज्ञात दोन जणांनी ट्रकच्या कॅबिनमध्ये घुसून ट्रकचालक शहजादला मारण्याचा धाक दाखवत खिश्यातील १६ हजार रूपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. चालकास चापट बुक्क्यांनी मारहाण करून दोघे फरार झाले होते. ट्रक चालक शहजाद मोहम्मद यांच्या फिर्यादीवरून पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पैठण एमआयडीसी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत एक दिवसाच्या आत दोघांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातुन चोरीची रक्कम जप्त केली. कैलास सोलाट व रामेश्वर मिसाळ दोघे (रा.कातपुर ता.पैठण) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस नाईक राहुल मोहोतमल, पोलीस अमलदार शफिक शेख, राजेश सोनवणे, दिनेश दाभाडे यांनी हि कारवाई केली आहे.

Related Articles

Back to top button