साहित्य व संस्कृती
नवकवी घडविण्याचे कार्य काव्यलेखन स्पर्धेतून होते – सुनील गोसावी, ‘शब्दगंध’ ची काव्यवाचन स्पर्धा
राहुरी | बाळकृष्ण भोसले – कविता ही कवींच्या मनातील उत्कट भावना असून कमीत कमी शब्दात आशयबध्द पद्धतीने तिची मांडणी होते. नवकवी घडविण्याचे महत्वाचे कार्य अशा काव्यलेखन स्पर्धेतूनच होते. शब्दगंध साहित्यिक परिषद ही गेल्या ४ वर्षापासून वेगवेगळ्या महाविद्यालयात जावून अशा स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा के.जे. सोमय्या महाविद्यालय, कोपरगांव व शब्दगंध साहित्यिक परिषद यांचे वतीने आयोजित केली होती. त्यावेळीं ते बोलत होते. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेत ७१ नवकवीनी बहुभाषिक कविता सादर केल्या. सकाळी १० वाजता सुरू झालेली ही स्पर्धा दुपारी ४ वाजेपर्यंत चालली. या काव्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एस.यादव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, साहित्यिक सुनील गोसावी, प्रसिध्दी प्रमुख साहित्यिक राजेंद्र फंड हे होते.
पुढे बोलताना सुनील गोसावी म्हणाले कि, गेल्या ४ वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा भरविल्या जात असून त्याला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो. साहित्यिक राजेंद्र फंड हे म्हणाले की, मागील वर्षी या महाविद्यालयाने काव्यवाचन स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. काही विद्यार्थीनी उत्कृष्ट कविता सादरीकरण केले, त्यांना नवकवी कसे म्हणावे. हे तर प्रतिथयश कवी वाटत आहेत. या वर्षीच्या काव्यलेखन स्पर्धेत जे कवी प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवतील त्यांच्या कवितेंचा समावेश आम्ही प्रकाशित करत असलेल्या “ग्रामसेवा संदेश” या दिवाळी अंकात केला जाईल.
या काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.उत्तम संस्कृती, द्वितीय क्रमांक कु.पराडे कल्याणी तर तृतीय क्रमांक कु.आलिया सय्यद हिने पटकावला. पुरस्कार प्राप्त विद्यार्थांना अनुक्रमे २५००, २१००, १५०० रुपयांचे पुस्तक संच व प्रमाणपत्र, तसेच उत्तेजनार्थ तीन विद्यार्थ्यांना ५०० रूपये किंमतीची पुस्तके व प्रमाण पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तालुकास्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे सुंदर आयोजन महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. संजय दवंगे यांनी केले. तर परीक्षक म्हणुन प्रा.डॉ. जे.एस.मोरे व प्रा.मधुमिता निळेकर , प्रा. श्रद्धा शिनगर यांनी काम पाहिले, या कार्यक्रमासाठी कोपरगांव तालुका शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रमोद येवले सह अनेक सदस्य व महाविद्यालयाचे बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. निलेश गायकवाड तर आभार प्रा. जे. आर. भोंडवे यांनी मानले.