ठळक बातम्या

उपचाराअभावी एकाही लम्पी आजारग्रस्त जनावराचा मृत्यु होणार नाही याची दक्षता घ्या- आ. तनपुरेंच्या सक्त सूचना

राहुरी | बाळकृष्ण भोसले – लंम्पी आजाराने शेतकऱ्यांकडील एकाही जनावराचा उपचारा अभावी मृत्यू होणार नाही तसेच सर्वच जनावरांचे आजारापासून बचाव होण्यासाठी लसीकरण पूर्ण करावे अशा सक्त सूचना माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.
श्री तनपुरे यांनी राहुरीतील पंचायत समितीच्या डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात सद्यस्थितीतील परिस्थिती व आढावा जाणून घेतला. त्यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीत तालुक्यातील जनावरांची अधिकृत माहिती घेतली. सध्या चालू असलेल्या लसीकरणाबाबत पडताळणी केली व महत्त्वाच्या सूचना दिल्या.
राहुरी तालुक्यात सुमारे एक लाख जनावरांची संख्या आहे. त्यापैकी ६२ हजार ८०३ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित पशुवैद्यकीय विभागाने अधिक वेगाने काम पूर्ण करावे. काही अडचणी असल्यास त्या स्पष्टपणे निदर्शनास आणून द्याव्यात. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्याशी संपर्क साधून लसीकरण राहिलेल्या जनावरांची माहिती घेतल्यास काम अधिक सुलभ होईल. लसीकरण मोहीम राबविताना अडथळे येणारच आहेत, असे असले तरी विविध यंत्रणेचा उपयोग करून लसीकरण पूर्ण करावे व जनावरांचा मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात असे तनपुरे यांनी नमूद केले.
तालुक्यात १३० जनावरांना लंम्पी आजाराने बाधा झाली होती. त्यापैकी ६५ जनावरे आजारातून मुक्त झाली तर उर्वरित जनावरे प्रतिसाद देऊ लागली. तालुक्यात आज अखेर सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात चेडगाव दोन, मुसळवाडी एक, देवळाली प्रवरा दोन, अंमळनेर एक अशी संख्या आहे. तनपुरे यांनी संबंधित विभाग  अधिकाऱ्यांकडून गावनिहाय माहिती घेतली. जनावरांचे शंभर टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेली माहिती संबंधित गावातील प्रमुखांशी श्री तनपुरे यांनी संपर्क साधून खातरजमा केली. यात काही प्रमाणात तफावत आढळून आली. काही तांत्रिक अडचणींमुळे तफावत निदर्शनास आल्यानंतर उपाय योजना सुचविल्या. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ सतीश पालवे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ अमर प्रसाद माने, सहाय्यक पशुधन अधिकारी पशुधन पर्यवेक्षक व १५ पशुधन रुग्णालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून सविस्तर माहिती सादर केली.

Related Articles

Back to top button