अहिल्यानगर
कौटुंबिक ‘सुसंस्कार’ माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगी पडतात : शर्मिला गोसावी
राहुरी | बाळकृष्ण भोसले – सध्या अतिरेकी चंगळवादाने जीवन सौंदर्याची, संस्कृतीची हानी होत आहे, आर्थिक संपत्तीने घरेदारे संपन्न होतील, पण मने जर असंस्कृत राहिले तर माणसातून पशु निर्माण होतील, यासाठी कुटुंबातून संस्कार होण्याची गरज आहे, संस्था हे एक कुटुंब असून येथून होत असलेले सुसंस्कार माणूस म्हणून जगण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतील असे मत ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांनी व्यक्त केले.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (विदळ घाट) अहमदनगर च्या वतीने ‘ नवदुर्गांचा जागर ‘ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात महिला सेलच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर महाविद्यालयाचे डीन डॉ.सुनिल म्हस्के, डेप्युटी डायरेक्टर डॉ.अभिजित दिवटे, महिला सेल प्रमुख डॉ.शुभदा अवचट, डॉ.अनिता राऊत, डॉ. सुनीता निघुटे, शितल गिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कवयित्री शर्मिला गोसावी म्हणाल्या कि, ‘वेगवेगळ्या रूपातील माणसे आपल्या अवतीभवती वावरत असतात. ज्याच्या ठाई एखाद्या रसाचा अतिरेक जास्त असेल तर त्या स्वभावाची ती माणसे होतात. साहित्यिकांच्या ठाई या सर्वच रसांचा अंतर्भाव थोड्या अधिक प्रमाणात झालेला असतो. या सर्व रसांना आपल्या भाषा सौंदर्याच्या साह्याने ते फुलविण्याचा प्रयत्न करतात. ही कला त्यांना जन्मजात अवगत असते म्हणून ते साहित्यिक बनतात. साहित्यिकाच्या ठाई असलेल्या या विविध रसाच्या अनुषंगाने साहित्यिक समाजासाठी आपले विचार प्रगट करत असतात.
यावेळी त्यांनी आपला साहित्यिक प्रवास उलगडून दाखवला. तसेच आपल्या काही रचना सादर केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नम्रता मराठे यांनी केले तर शेवटी उर्मिला द्रविड यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.