ठळक बातम्या

टाकळी येथे घोणस अळीचा शेतकऱ्याला चावा; प्रकृती स्थिर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

विलास लाटे | पैठण : तालुक्यातील टाकळी येथील एका शेतकऱ्याला बुधवारी (दि.२८) घोणस अळीने चावा घेतल्याने त्याला चक्कर येणे तसेच तीव्र वेदना होऊ लागल्याने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र घोणस अळी आढळल्यामुळे गावात शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकळी येथील शेतकरी चांद सय्यद हे बुधवारी शेतात गेले होते. त्यांच्या हाताला अचानक घोणस या अळीने चावा घेतला. चावा घेताच त्यांना चक्कर आल्यासारखे वाटले व त्यांच्या हाताला तीव्र वेदना जाणवू लागल्या. वेळीच त्यांना ढोरकीन येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. परंतु घोणस अळी आढळल्यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात या घोणस अळीच्या संकटाची भर पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या शेतीचे दिवस आहेत व या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
जुलै महिन्यापासून सुरू असलेला पाऊस आतापर्यंत सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन पीक पिवळे पडणे, कुजणे असे प्रकार घडत आहेत. निसर्गाच्या या अस्मानी संकटामुळे हतबल झालेला शेतकरी हा आता नवीन संकटात सुद्धा अडकला आहे. या संकटातून बाहेर कसे पडावे असे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी या अळी पासून काळजी घेण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button