अहिल्यानगर
झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार तरी केव्हा ? – छावा क्रांतीवीर सेनेचा सवाल
संगमनेर शहर : झोपलेल्या जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला उठवायचे तरी कसे ? असा प्रश्न संगमनेर येथील छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनामुळे खेडेगावातील विकासाला खीळ बसुन विकासाची गती मंदावली आहे. प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे नुकतेच कांगोणी, ता. नेवासा येथे तक्रारदाराच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला आहे. या घटनेतुन निद्रेत असलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी किती प्रयत्न करायचे ? असा प्रश्न पुढे येत आहे.
असाच प्रकार संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे घडत असल्याचे समोर येत आहे. घुलेवाडी ग्रामपंचायतच्या गलथान कारभाराबाबत पंचायत समिती, संगमनेर येथे छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी उपोषण करण्यात आले. त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी उपोषण स्थळी भेट देवुन उपोषणकर्ते यांना लेखी आश्वासन देवुन विस्तार अधिकारी कासार आर.एम., माळी एस.जी. यांना चौकशीचे आदेश देवुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले. अहवालाबाबत कासार यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहेत. सदर चौकशी पुर्ण होवुनही अहवाल का लपवला जातोय हा प्रश्न घुलेवाडीतील सामान्य नागरीक विचारीत आहे. या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम गटविकास अधिकारी करीत आहेत की काय? असे सामान्य लोकांना प्रश्न पडला आहे.
तरी गटविकास अधिकारी यांनी दोन दिवसात अहवाल उघड न केल्यास पंचायत समितीपुढे ऐनवेळी प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोलताशा, घंटानाद करुन आंदोलन केले जाईल असे छावा क्रांतीवीर सेना कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप राऊत यांनी माहिती दिली आहे.