अहमदनगर

स्व.सौ.पुष्पाताई सुखदेव सुकळे यांच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमात सोमवारी विविध उपक्रम

श्रीरामपूर : येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ.स्व पुष्पाताई सुखदेव सुकळे यांच्या स्मरणार्थ माऊली वृद्धाश्रमात देणगी प्रदान, अन्नदान,    सामाजिक प्रबोधन व्याख्याने असे विविध उपक्रम सोमवार दि. 08 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.
सौ.स्व. पुष्पाताई सुखदेव सुकळे यांचा अंत्यविधी कोणतेही अनावश्यक धार्मिक विधी न करता पार पडला. दशक्रियाविधी, महिनाविधी न करता ही सर्व रक्कम माऊली वृद्धाश्रमात चाललेल्या सेवाभावी कार्यास देण्यात येणार आहे. बांधकामास देणगी देण्यात येणार आहे. तसेच ‘पुष्पाताईचा वृक्ष’ यासंदर्भाने परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सुखदेव सुकळे हे वीरशैव समाजाचे असून त्यांनी पारंपरिक रूढींना फाटा दिला आहे. जीवन्तपणी माणसाने माणसांची प्रामाणिकपणे सेवा करावी हा आदर्श विचार त्यांनी कृतीत आणला आहे.
यावेळी माजी प्राचार्य टी.ई.शेळके, प्राचार्य शन्करराव अनारसे, साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे यांची सामाजिक प्रबोधनपर व्याख्याने होणार आहेत. स्व.पुष्पाताई व सुखदेव सुकळे यांचा विवाह 18 मार्च 1971 रोजी संपन्न झाला. मेहेकरी ता. जि. अहमदनगर येथील बाबुराव दगडू बुरकुले (वाणी ) यांची कन्या असलेल्या पुष्पाताई यांनी अतिशय कष्टपूर्वक संसाराची उभारणी केली. पुष्पाताई यांना बाळासाहेब, संजय, रमेश, दिनेश, सुरेश, राजेश असे बुरकुले बंधू आहेत. सुखदेव सुकळे हे 1965 ला चंद्रपूर जिल्ह्यातील उसगाव येथून श्रीरामपूर येथे आले.
स्व. नामदेवराव सुकळे हे बंधू अशोक कारखान्यात काम करीत होते. सुखदेव सुकळे यांनी 21 सप्टेंबर 1968 ते 30 जून 2005 या काळात रयत शिक्षण संस्थेच्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून प्रामाणिक सेवा केली. सुखदेव सुकळे यांनी सौ. पुष्पाताई यांची दीर्घ आजारात खूप काळजी घेतली. पुष्पाताई सुकळे यांनी बुरकुले, वाडणकर, सुकळे परिवारावर खूप प्रेम केले. स्वतःला मूलबाळ नसले तरी त्यांनी या परिवारातील सर्वांना मायेचा आधार आणि आईरुपी वात्सल्याचा स्नेह दिला. 1972 च्या दुष्काळात सर्व परिवाराला सावरून धरले. सरांच्या कमी पगारात काटकसरीने संसार केला.
सुखदेव सुकळे हे महाविद्यालयाच्या कामात सदैव व्यस्त असत, त्यामुळे संसाराचा सगळा गाडा त्यांनी हिंमतीने आणि कौशल्याने पुढे नेला. त्या स्वतः घरातील भाजीपाला, किराणा सामान आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करीत. सुकळेसर यांनी कॉलेजचे काम, ॲड. रावसाहेब शिंदे यांचा पत्रव्यवहार, साहित्यकार्य, उपक्रम या कामात स्वतःला गुंतवून घेतले होते, त्यामुळे घराची सर्व जबाबदारी सौ. पुष्पाताई सांभाळत असत. त्यांचे वडील बाबूशेठ बुरकुले हे समाजात एक प्रतिष्ठित किराणा व्यापारी होते. अशी आतिथ्यशीलता आणि सुसंस्कार पुष्पाताईं यांनी जीवनात जपली.
सुखदेव सुकळे यांनी महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी 30 जानेवारी 2018 रोजी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानची स्थापना केली. या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक कार्यात झोकून दिले. आजारपणातही त्यांनी सरांना साथ, सोबत केली. उपक्रमाला प्राधान्य दिले. 23 वर्षे त्यांनी बोरावके चाळीत घालविले. 1995 ला नव्या घरात राहण्यास आले. त्यांचे सर्व बुरकुले बंधू संसारात सुखी, समाधानी आहेत. एक समर्थ मनाची संसारी आणि संस्कारी स्त्री ही भारताची खरी ओळख आहे, ती स्व.सौ.पुष्पाताई सुकळे यांच्या आदर्शरूपी गृहिणीतून दिसते. अशा आदर्श गृहिणीच्या स्मरणार्थ सेवाभावी उपक्रम आयोजित केले आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सुखदेव सुकळे, सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button