कृषी
जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे- सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे
राहुरी विद्यापीठ : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. याचा परिणाम म्हणजे पिकांची उत्पादन क्षमता कमी होवून शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्याकरीता शेतकर्यांनी आपल्या जमिनीत शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करुन जमीन जास्तीत जास्त उत्पादनक्षम कशी होईल हे पाहिले पाहिजे. त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगावच्या ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक प्रशिक्षण 2022-23 व आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन मांजरसुंबा ता. नगर या गावात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. अहिरे बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सेंद्रियशेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शेतकर्यांना सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. अनिल दुरगुडे यांनी कांदा व सोयाबीन या पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्व, माती परिक्षण तसेच देशी गाय व संकरित गाय यांच्या शेण व मूत्र यामधील फरकाचे विवेचन केले. सहयोगी प्राध्यापक व रावे समन्वयक डॉ. चारुदत्त चौधरी यांनी सोयाबीन व कांदा या पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला मांजरसुंबा गावच्या सरपंच सौ. मंगलताई कदम, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन जालिंदर कदम व वांबोरी, कुक्कडवेढे गावातील शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला डॉ. मनोज गुड व डॉ. प्रेरणा भोसले उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत मांजरसुंबा येथील कृषिकन्या समीक्षा आव्हाळे हिने केले. या शेतकरी मेळाव्याचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुक्कडवेढे येथील कृषिकन्या प्रज्ञा घुले हिने केले तर उपस्थितांचे आभार वांबोरी येथील कृषिकन्या वैष्णवी कासार हिने मानले. या कार्यक्रमानंतर सर्व शास्त्रज्ञांनी दत्तात्रेय यशवंत भुतकर यांच्या सोयाबीन व मका पिकास भेट देऊन मार्गदर्शन केले.