अहमदनगर
कोल्हार महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा
राहुरी | बाळकृष्ण भोसले – पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार यांच्या राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब आर आर सी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिवस १२ ऑगस्ट महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष उबाळे समन्वयक ग्रामीण रुग्णालय लोणी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिभाऊ आहेर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण तुपे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत रेड रिबन क्लब चे उद्घाटन करण्यात आलेे.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष उबाळे म्हणाले आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी ‘पिढीच्यात एकात्मता: सर्व वयोगटासाठी जग तयार करणे’ हे घोषवाक्य घेण्यात आले. संयुक्त राष्ट्रांनी १९८५ मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १९९५ मध्ये जगातील युवा वर्गाच्या परिस्थितीत अनुकुल बदल घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ’ स्वीकारण्यात येऊन त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एच.आय.व्ही. एड्स आदी १५ क्षेत्रांची निवड प्राध्यान्याने केली. युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले आहेत.
लिस्बन येथे ८ ते १२ ऑगस्ट १९९८ दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर १७ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हरिभाऊ आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण तुपे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका संगीता धिमते यांनी केले. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थी प्रतिनिधी कु. आरती नवगिरे यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रा. उत्तम येवले यांनी केले. याप्रसंगी आय.क्यू.ए सी.चे चेअरमन प्रा. परमेश्वर विखे, प्रा. पांडूरंग औटी, डॉ. अश्विनी आहेर, प्रा.जाधव प्रणिता प्राध्यापिका वडीतके, प्रा. शरद दिघे, प्रा. सागर घोलप तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.