अहिल्यानगर

दिव्यांग व्यक्तीसाठी पंचायत समिती प्रयत्नशील- धस

श्रीरामपुर | बाबासाहेब चेडे : अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना सातत्यपूर्ण दिव्यांगा करिता सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पुनर्वसन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. दिव्यांग व्यक्तीच्या जीवनातील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. दिव्यांग व्यक्तीच्या सामाजिक अभिसरण प्रक्रियेमुळे अनेकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. पंचायत समिती मार्फत 5 % निधीतून अनेक दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिक पुनर्वसन करण्यासाठी पिठाची गिरणी प्रदान करण्यात आली त्यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे असे प्रतिपादन ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी केले.
आमच्या अपंग सामाजिक विकास संस्था पदाधिकारी व आसान दिव्यांग संघटना पदाधिकारी यांना ध्वजारोहणाचा जो सन्मान दिला तो नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी श्रीरामपूर पंचायत समिती ध्वजारोहणाप्रसंगी केले. आझादी का अमृत महोत्सव निमित्त श्रीरामपूर पंचायत समितीच्या वतीने फाळणी दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, महिला राज्याध्यक्ष सौ स्नेहा कुलकर्णी, राज्य समन्वयक विनोद कांबळे, राज्य उपाध्यक्ष सुनिल कानडे, गंगाधर सोमवंशी,सुदिप कुलकर्णी, संजय तुपे, महेश छतवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड या दांपत्याचे दिव्यांगा प्रती असलेली सामाजिक निष्ठा नक्कीच कौतुकास्पद आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाने सादर केलेल्या पथनाट्या करिता अतिशय मोलाचे सहकार्य लाभले असे मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती कर्मचारी अश्विनी पारधे, सुनिता लोहाळे, विशेष शिक्षिका वंदना गिरमे यांनी आझादी का अमृत महोत्सव निमित्त विविध विभागांच्या विषयानुसार सुरेख रांगोळी प्रदर्शन करण्यात आले होते. सदर रांगोळी प्रदर्शनास प्रमुख अतिथी संजय साळवे व वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक इरफान शेख यांनी केले. आभार गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी मानले. याप्रसंगी पंचायत समिती सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button