छत्रपती संभाजीनगर
पैठण एमआयडीसीत कामगार भवनासाठी प्रयत्न करणार – विलास भुमरे
विलास लाटे | पैठण : पैठण एमआयडीसी परीसरातील जैनस्पीनर कंपनी समोर राज्य कर्मचारी विमा सोसायटीच्या वतीने बाह्य रुग्ण सेवा दवाखाना सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन जि.प.सदस्य विलास भुमरे यांच्या हस्ते शुक्रवारी (१९) करण्यात आले. याप्रसंगी कामगार नेते विष्णु बोडखे यांनी पैठण एमआयडीसीत कामगार भवन व्हावे अशी मागणी केली. यावर जि.प.सदस्य विलास भुमरे यांनी मंत्री भुमरे यांच्याकडे पाठपुरावा करून कामगार भवन घेऊ असे आश्वासन दिले.
यावेळी वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ.पृथ्वीराज राठोड, चिकलठाणा ई.एस.आय. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक भोसले, कामगार नेते विष्णु बोडखे, प्रकाश जाधव, डांगे आप्पा, संजय नवले, कल्याण मोहिते, सतिष दिवटे, राहूल गवळी, आयटक कामगार संघटनेचे राजु डोहीफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या परीसरातील कामगारांना वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी औरंगाबाद किंवा वाळूज येथे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन या भागात दवाखाना सुरू करण्यासाठी कामगार नेते विष्णु बोडखे, प्रकाश जाधव यांनी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर याला यश आले.
या सेवा दवाखान्यात दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, दोन लिपीक, तीन शिपाई असे कर्मचारी असतील. थोड्या दिवसांत पाच डाॅक्टर व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांसह प्रयोगशाळा, एक्सरे, रुग्णवाहिका व परीसरातील सेकंडरी केयर सुविधा मिळण्यासाठी खाजगी रुग्णालय टाय-अप करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासन अधिकारी डॉ.राठोड यांनी दिली. याप्रसंगी रानभरे, राजु राठोड, बालाजी नागेश्वर, सुखदेव चांडोल, इंगळेसह आदी कामगारांची उपस्थिती होती.