अहिल्यानगर
प्रेरणा वि.का. संस्थेचा आदर्श कारभार इतर संस्थांसाठी प्रेरणादायी – सभापती तनपुरे
राहुरी | बाळकृष्ण भोसले – गुहा येथील प्रेरणा विविध विकास संस्थेने केलेला कारभार हा आदर्श आहे. इतर विकास सेवा संस्थांना ही तो प्रेरणादायी आहे. संस्थेला उज्वल भवितव्य असून गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू नजीकच्या काळात ही संस्था बनावी अशी अपेक्षा राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले.
गुहा येथे प्रेरणा विविध विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डाँ.बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम एक वर्ष बंद होते. गळीत हंगाम एक वर्ष बंद राहिल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांना अन्य कारखान्यांना ऊस द्यावा लागला. त्याचा जिल्हा सहकारी बँकेच्या व विविध विकास सेवा सहकारी संस्थेच्या वसुलीवर परिणाम झाला. अशा परिस्थितीतही तालुक्यात जिल्हा बँकेची ६५ टक्के वसुली झाली. प्रेरणा विकास संस्थेने अशा परिस्थितीत सभासद पातळीवर शंभर टक्के वसुली केली. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विकास संस्थेने उत्पन्नाचे विविध मार्ग शोधले पाहिजेत. संस्थेला उज्वल भवितव्य आहे. तालुक्यात मोजक्या सहकारी संस्था नफ्यात असून त्यात प्रेरणाचा समावेश आहे. डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी दूरदृष्टी ठेवून सहकारी संस्थांसाठी त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी करून ठेवल्या. त्याच धर्तीवर प्रेरणा पतसंस्थेने ही विकासासाठी काही एकर जागा खरेदी करावी व विकासाचा आराखडा तयार करावा. गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू प्रेरणा विकास झाली पाहिजे. राहुरी बाजार समिती कडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सतत वाढतो आहे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही काटा व वेळेवर पेमेंट यामुळे राहुरी बाजार समितीचा कारभार जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्श ठरलेला आहे.
प्रेरणाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले, संस्थेने अहवाल वर्षात दीड कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तीन लाख रुपये नफा झाला असून पाच टक्के लाभांश सभासदांना सलग २० वर्षांपासून संस्था देत आहे. इमारत निधीची सुद्धा तरतुद केली आहे. मा. खा. प्रसाद तनपुरे साहेबाच्या नेत्वृताखाली संस्थेची प्रगती पथावर आहे. लवकरच संस्थेचे अद्ययावत सर्व सोयीसुविधा युक्त इमारत बांधण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. देशपातळीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्थांच्या बैठकीला आपण उपस्थित होतो. विकास सेवा संस्था या ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू करण्याचे केंद्र शासनाचा मानस आहे. त्यासाठी आदर्श पोटनियम प्रत्येक राज्याला पाठविण्यात आले आहेत. नाबार्ड मार्फत चार टक्के इतक्या अल्प दराने संस्थाना कर्जपुरवठा केला जाणार आहे. ४१ प्रकारचे उद्योगधंदे या विकास संस्था नव्याने सुरू करू शकतात. पूर्णपणे पेपरलेस व ऑनलाइन कारभार द्वारे या सेवा सहकारी संस्था थेट देश पातळीवरती जोडल्या जाणार आहेत. ग्रामीण भागात बँकिंगच्या सेवा सुविधाही विकास संस्थांनी उपलब्ध करून द्याव्यात असे केद्रांचे मत आहे. विकास संस्था या बहुउद्देशीय विकास संस्था म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकतात. आदर्श व पारदर्शक कारभार केला पाहिजे देश पातळीवर ऑनलाइन पद्धतीने त्या जोडल्या जाणार आहेत. सेवा संस्थातील कारभार पेपर लेस होणार आहे.
प्रा. वेणुनाथ लांबे यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक गोरक्षनाथ चंद्रे यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक उरे यांनी संस्थेविषयी सभासदांना माहिती दिली. सरपंच उषा चंद्रे, प्रेरणा मल्टी स्टेट चे व्हा चेअरमन विष्णुपंत वर्पे, प्रेरणा पत संस्थेचे व्हा चेअरमन मच्छिंद्र हुरुळे, केडरचे दत्तात्रय गांढे शरद वाबळे, तांबेरी विकास सोसायटीचे चेअरमन श्रीकांत मुसमाडे, किशोर घागरे, सुजित वाबळे, मा संरपच रामनाथ पा. उरे, भोमा शिंदे, शिवाजी उरे, बबन कोळसे, संपत कोळसे, विजय वाबळे, अशोक आंबेकर, सिद्धार्थ वाबळे यांच्यासह सर्व संचालक व सभासद हजर होते. सादीक सय्यद यांनी आभार मानले.