अहिल्यानगर
हजारो भाविकांच्या उपस्थितीत मतमाउली यात्रा शुभारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील मतमाउली भक्तिस्थान संत तेरेजा चर्च येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत ७४ व्या मतमाउली यात्रेचा शुभारंभ नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांच्या हस्ते ध्वजारोह्नाने व पवित्र मिसा बलिदान अर्पण करून संपन्न झाला. प्रारंभी मतमाउली मूर्तीच्या रथातून महागुरुस्वामी लूरडस डानियल व हरिगाव चर्च प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे विराजमान होऊन हरिगाव सर्व बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी हजारो भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर महागुरुस्वामी यांच्या हस्ते व अनेक धर्मगुरू यांचे उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक, रिचर्ड, सचिन मुन्तोडे, मायकल वाघमारे, लोयोला सदन प्रमुख धर्मगुरू ज्यो गायकवाड, सायमन शिणगारे, पोली डिसिल्व्हा, संजय पटारे आदी धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी महागुरूस्वामी यांनी प्रतिपादन केले की पवित्र मारिया ही देवाची दासी आहे. देवापुढे मी श्रीमत आहे, पुढारी आहे हे काहीच नाही. परमेश्वराने या मातेला निवडले प्रभू येशूला जन्म देण्यासाठी. प्रभू येशू देवपुत्र आहे मरिया ही सर्वांची आई आहे. मी कितीही आजारी असलो किती कष्टात असलो तरी परमेश्वराचे कार्य करण्यासाठी मला या जगात पाठविले आहे.
प्रत्येकाला परमेश्वराने हे कार्य दिले आहे. त्यासाठी मनन करा मिस्साच्या अगोदर यानंतर या शांत बसा, आईची प्रार्थना करा हे माते देवाने मला का मनुष्य रूप दिले आहे. माझ्या जीवनात मी देवासाठी काय करू, परमेश्वराने ज्या प्रमाणे तिला निवडले तसे आपल्याला परमेश्वराने निवडले आहे. तिचा पुत्र आपल्याला काय सांगतो”ज्याप्रमाणे मी तुम्हावर प्रीती केली त्याप्रमाणे तुम्ही एकमेकावर प्रीती करा, आपले जीवन किती सुंदर आहे आपल्या जीवनात देव आहे, आपल्या जीवनात प्रभू येशू आहे, आपल्या जीवनात मरिया आहे. संतजन आहेत देवदूत आहेत. गरिबी पाहून निराश होऊ नका, कष्ट, जीवनात दु:ख हे अविभाज्य भाग आहे, निराश होऊ नका जे घडते त्याकडे पाहू नका, एकमेकासाठी प्रेमाने श्रद्धेने प्रार्थना करा, आज पवित्र मरीयाकडे प्रार्थना करतो हे माते. आम्हासाठी मध्यस्थी कर, आम्ही पापी आहोत. पापामुळे जीवनाचा अंत होऊ नये जोपर्यंत आम्ही विचार करू शकतो तोपर्यंत आम्ही जिवंत आहोत आमच्या अंत:करणात तुझा सहवास घडावा आदी मौलिक पवित्र मरीयेच्या जीवनावर महिमा वर्णन केला.
आज दि १ सप्टेंबर रोजी रा रे बिशप थोमस डाबरे पुणे धर्मप्रांत यांचे देवदूताच्या संदेशाला पवित्र मारीयेचा नम्र प्रतिसाद या विषयावर नोव्हेना प्रसंगी प्रवचन होईल. तरी या कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू आदींनी केले आहे.