सामाजिक
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या संचालकपदी पवार
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या संचालकपदी राहुरी येथील संभाजी पवार यांची निवड नाशिक विभाग ग्रंथालय संघाच्या, धुळे येथे झालेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली.
ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर संभाजी पवार यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, मुंबई ही राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाची सर्वोच्च संस्था असून, या निमित्ताने अहमदनगरला राज्यस्तरावर नेर्तुत्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे. साहित्यप्रेमी, चोखंदळ वाचक, ग्रंथविक्रेते, प्रकाशक, ग्रंथपाल, ग्रंथालये आदि घटकांना बरोबर घेऊन अमेरिकेतील “फ्रेंडस ऑफ लायब्ररी” च्या धर्तीवर “ग्रंथालय मित्रमंडळ” उपक्रमाचे संचलन संभाजी पवार करीत आहेत. ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात “ग्रंथालय चळवळ” टिकविण्यासंदर्भात ‘ठराव’ उपस्थित करून तो मंजूर करून शासनाकडे पाठविण्यासाठी संभाजी पवार यांचे मोठे योगदान आहे. लोकसहभागातून वाचनसंस्कृती रूजवितानाच, वेगवेगळ्या व्यासपीठावरून ग्रंथालय चळवळ सक्षमीकरणासाठी शासनदरबारी ते सातत्याने प्रत्यनशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, मा.खा.प्रसाद तनपुरे, शिक्षक भारतीचे संस्थापक आ. कपिल पाटील, ग्रंथमित्र सुरेश हराळ, जलमित्र शिवाजी घाडगे, दादासाहेब शिरसाठ यांनी अभिनंदन केले आहे.