सामाजिक

अनाथ चिमुकल्यासाठी त्रिभुवन दाम्पत्याने दिली मायेची सावली

चिंचोली प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर अनेक बालके निराधार झाली. गरिबांच्या या महामारीत चुली विझल्या. त्या पेटविण्यासाठी काही सामाजिक संस्था, व्यक्ती पुढे सरसावल्या पणं त्यांनाही मर्यादा आल्या. पुढील आणखी काहिकाळ अशा घटकांना पुन्हा भरारी घेण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. ग्रामीण भागात याचे मोठे चटके फारकाळ जाणवतील यात शंकाच नाही.

   आईवडीलांबरोबरच घरातील कर्ती माणसं कोरोनानं हिरावल्यामुळे तरण्या पासून म्हाताऱ्यापर्यंत माणसं निराधार झाली. तशीच अवस्था चिमुकल्यांचीही पहावयास मिळते. हक्काचा पदर मायेन सावलीसारखा अंगावर टाकला तरी पोट भरल्याची जाणीव देणारी आई, तर कीतीही दु:ख झालं तरी ते दु:ख आपल्या लेकरांसाठी निमुटपणे गिळणारा बाप, ते दु:ख डोळ्याच्या कडा पाणावलेल्या न दिसू देता त्या दु:खाचा आवंढा गिळत आपल्या लेकरांवर आभाळमाया देणारा तो बाप काही कळण्याच्या आत हिरावला तर त्या दु:खाची परिसीमा कोणत्याही परिमाणाने मोजण्यासारखी नसते.
   असाच प्रसंग कोपरगाव तालुक्यातील एका दिड वर्षाच्या चिमुकल्यावर आला कोरोना महामारीने त्याच्या मायेची सावली देणारी आई नि वडील दोघेही त्याच्यापासून हिरावले गेले. त्या निरागस चिमुकल्याला काही कळण्याच्या नि अजून खेळण्या बागडण्याच्या वयाअगोदरच निराधार व्हावं लागल. सर्व जबाबदारी वयस्क आजीवर आली अखेरचे दिवस मोजत असलेल्या आजीवर या दु:खाने डोंगरच कोसळला. 
     ही घटना नातेवाईकांमार्फत चिंचोली येथील प्रा. सौ. मिनाताई व सामाजिक कार्यकर्ते श्री मधुकर या त्रिभुवन दाम्पत्याला समजली. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या कुटुंबाने आपण या १७ महिने वयाच्या चिमुकल्या बालकाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय त्या चिमुकल्याच्या आजीजवळ व्यक्त केला. त्या आजीनेही आपल्या नातेवाईकांसमवेत चर्चा करत प्रदिर्घ विचारांती दत्तक देण्याचा निर्णय घेतला नि या त्रिभुवन दाम्पत्याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत अखेर १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी सर्व सोपस्कार पार पाडत कोणताही बडेजाव न करता या चिमुकल्याला आपल्या घरी आणले.
  स्वतः मिनाताई त्रिभुवन महाविद्यालयात प्राध्यापक असून या चिमुकल्याची आई बनून यथायोग्य संगोपन करत त्याचे भविष्य उज्वल करणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तर श्री मधुकर यांनी हा निर्णय आम्ही पुर्ण विचारांती घेतला असून एक सामाजिक कर्तव्य पार पाडल्याची भावना व्यक्त केली.

या त्रिभुवन दाम्पत्याच्या समाजोपयोगी निर्णयाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बाळकृष्ण भोसले यांनी त्रिभुवन दाम्पत्याच्या निवासस्थानी जावून या सामाजिक उपक्रमाबद्दल या उभयतांचे अभिनंदन केले असून समाजातील सक्षम घटकांनी पुढे येत अशा निराधार झालेल्या कुटुंबाला बळ देत त्यांचा आधारवड बनण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Back to top button