अहिल्यानगर
मनसेच्या दणक्याने झोमॅटोच्या कामगारांना अखेर न्याय
संगमनेर प्रतिनिधी/ बाळासाहेब भोर : येथील झोमॅटोमध्ये रायडर म्हणून काम करणाऱ्या ३० ते ३५ कामगारांची वेतनवाढ अडवून ठेवण्यात आली होती. कामगारांनी वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेरीस त्या सर्व कामगारांनी तीन दिवसांपूर्वी संपाचे हत्यार उपसले. संप केल्यामुळे त्या सर्व कामगारांची आयडी ब्लॉक करून कंपनीने त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे हताश झालेल्या त्या सर्व कामगारांनी काल संगमनेर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. अखेर मनसे दणका बसताच झोमॅटो प्रशासनाने त्या सर्व कामगारांचे निलंबन मागे घेतले आणि तात्काळ पगारवाढ देऊ केली आणि उर्वरित मागण्याही येत्या चार ते पाच दिवसांत सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. सर्व कामगारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, गजानन राणे, विजय निकम व संगमनेर मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचे मनापासून आभार व्यक्त केले. जेंव्हा जेंव्हा मराठी माणसावर अन्याय होतो तेंव्हा तेंव्हा मनसेच त्यांच्या मदतीला धावून येते अस आम्ही फक्त ऐकून होतो आज प्रत्यक्षात त्याचा अनुभवही घेतला अशी भावना त्या सर्व कामगारांनी बोलून दाखविली.