ठळक बातम्या
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – क्रांतीसेनेचे कृषीमंत्र्यांना निवेदन
कृषी मंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजु पाटील गौळकर व कार्यकर्ते…
हिंगोली : नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अनेक जिल्ह्यांत झाला आहे.परिणामी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अतिवृष्टी व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेत अखिल भारतीय क्रांतीसेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष राजु पाटील गौळकर यांनी हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन दिले.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन,मुग,उडीद व इतर पिकांना मोड फुटले असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.तसेच नद्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी सर्कल मधील गावांना अतिवृष्टी व पुराचा मोठा फटका बसला आहे.यामुळे संपुर्ण हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.निवेदनावर मराठवाडा संपर्क प्रमुख राजीव पवनकर,जिल्हा उपाध्यक्ष संतोष नरवडे,चिंचोडीचे सरपंच रमेशराव करनोर,शरदराव मस्के,उपसरपंच रमेशराव राऊत, भगवानराव शिंदे, पांडुरंग खुडे, प्रदिप मस्के, गणेश इंगळे, बालाजी इंगळे,कृष्णा इंगळे,महादेव हारण, पंजाबराव देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.