महाराष्ट्र
संपूर्ण भारतात शेतकऱ्यांच्या दुधाला एकच भाव देण्याची अखिल भारतीय क्रांतीसेनेची मागणी
औरंगाबाद:आज संपूर्ण भारतात दूध दर वाढीबाबत आंदोलन सुरु आहेत. त्या अनुशंगाने अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पक्षाध्यक्ष संतोष तांबे पाटील यांनी दुधाला महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात एकच दर मिळावा,अशी मागणी (NDDB) नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड चे चेअरमन श्री. दिलीप राठ आणि (NCDFI) नॅशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन मंगल जीत राय यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये दुधाच्या भावामध्ये फरक आहे सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात (३.५ FAT, SNF ८.५) २५ ते २६ रु. प्रती लिटर भाव मिळतो तर त्याच प्रकारच्या दुधाला अहमदनगर, औरंगाबाद, सोलापुरच्या शेतकऱ्यांना १६ ते २० रु. प्रती लिटर भाव दिला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा तेच दुध पिशवी मध्ये विक्रीस येते तेव्हा त्याच दुधाची किंमत ४५ रु. प्रती लिटर अशी मोजावी लागते. समान कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शोषण थांबले पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे. दुध संघ, दुध संकलन केंद्र स्वतःच्या मार्जीने जे भाव ठरवतात त्यावर (NDDB) नॅशनल डेअरी डेवलपमेंट बोर्ड चे चेअरमन श्री. दिलीप राठ आणि (NCDFI) नॅशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया चे चेअरमन श्री. मंगल जीत राय यांनी लक्ष देऊन संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात दुधाला एकच हमीभाव देण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली.