छत्रपती संभाजीनगर
नाथसागराच्या आठरा दरवाज्यातून गोदापात्रात ९ हजार क्युसेक वेगाने पाणी; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पैठण / विलास लाटे : नाथसागर अर्थात जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने या धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. सद्या धरणातून ९ हजार ४३२ क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे. तर नगरसह वरच्या भागातून धरणात ३६ हजार १२९ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी ही माहिती दिली.
जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नगर, नाशिकसह वरच्या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलण्यात आले व गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले. तसेच, टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे.
सद्या जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्रातून दीड हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून, उजव्या कालव्यातून ५०० व १८ मुख्य दरवाजातून साडेनऊ हजार क्युसेक वेगानी पाणी सोडले जात आहे. नाशिक व नगर परिसरात भरपूर पाऊस झाल्याने जायकवाडी धरण ९१ टक्के क्षमतेपर्यंत भरले असल्याने जायकवाडी धरणाच्या पाणीपातळी मध्ये झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असल्याने ९ हजार ४३२ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचे आठरा दरवाजे उघडण्यात आले आहे.
गोदाकाठच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, विशेषतः पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर आणि पलीकडील माजलगाव, गेवराई भागातील गोदाकाठच्या गावात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी. घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. नदीपात्रालगतच्या भागातील शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे, मोटारी, विद्युत उपकरणे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित ठेवावे. नदीलगतच्या घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देणे संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
नूकतेच नाथसागराचे आठरा दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात ९ हजार ४३२ क्युसेसने पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर, बंडु अंधारे, न.प.चे उपमुख्याधिकारी शेख, पैठणचे नायब तहसिलदार दत्तात्रय निलावड सह पाणी पुरवठाचे व्यंकट पापुलवार याची उपस्थिति होती. धरण प्रशासन व तालुका प्रशासनाची यंत्रणा सतर्क झाली आहे.