अहिल्यानगर
बारागाव नांदूर परिसरात आढळला अजगर
राहुरी : तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ढोकरवाडी, परिसरात गाडे वस्तीवर रात्री साडे अकराच्या सुमारास एक 9 ते 10 फूट लांबीचा अजगर शिकारीच्या शोधात आला असता एकच धांदल उडाली.
त्यावेळी तेथील सिद्धार्थ गाडे यांनी राहुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे यांना फोन करून कळवले असता पाचरणे यांनी नांदूर विभागाचे वनरक्षक पवन निकम यांना फोन करून घटनास्थळी जाण्यास सांगितले. निकम यांनी ताबडतोब राहुरी शहरातील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना सोबत घेऊन नांदूर गाठले. घटनास्थळी जाऊन सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी भल्या मोठ्या अजगरास पकडून ताब्यात घेतले व नागरिकांना आव्हान केले की अश्या प्रकारे कोणताही साप व इतर वन्यजीव आढळून आल्यास त्याला कोणतीही इजा न करता वनविभागाशी संपर्क करावा ते नक्कीच आपली जबाबदारी पार पडतील.
सदर अजगरास निसर्गात मुक्त करण्यात येईल असे वनरक्षक पवन निकम यांनी सांगितले. यावेळी घटनास्थळी अजगराला बघायला मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी तिथे वनरक्षक पवन निकम, ताराचंद गायकवाड, सर्पमित्र मुजीब देशमुख, सिद्धार्थ गाडे, तुषार गाडे, अण्णापाटील गाडे, रवींद्र गाडे, कैलास पटारे, संदीप पटारे, ज्ञानेश्वर पटारे, किरण गुंजाळ, गोविंद दहिवाळकर, अमृत दहिवाळकर, किरण तोडमल, गणेश ढोले, राहुल घुले आदी उपस्थित होते.