सामाजिक
भूमी फाउंडेशन वतीने ॲम्बुलन्स ड्रायव्हरांचा सन्मान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल आणि कैलास पवार यांच्या संकल्पनेतून 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास तसेच असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन स्थापित भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भागात तसेच विद्यार्थी वर्ग, तृतीयपंथी समाज, विधवा निराधार महिला, अनाथ मुलं, निराधार वृद्ध, वृद्ध आश्रम, अनाथ आश्रम तसेच शेतकरी वर्ग आणि विविध आपत्तीच्या काळात अनेक ठिकाणी संस्थेने भरीव असे योगदान दिले आहे.
अनेक वर्षापासून ॲम्बुलन्स ड्रायव्हर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना जीवदान देण्याकरिता जीवाची आटापिटा करत असंख्य रुग्णांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी पणे कार्य केले आहे. परंतु आज पर्यंत या ॲम्बुलन्स ड्रायव्हरच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडताना कधी दिसली नाही. या अनुषंगाने कैलास पवार यांनी आपला वाढदिवस एक आगळावेगळा म्हणून या लोकांसोबत साजरा केला.
यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक ॲम्बुलन्स ड्रायव्हर यांचा सन्मान चिन्ह आणी ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले. यावेळी असंख्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्य हे नॅशनल अवॉर्ड प्राप्त मंगल मुखी किन्नर चारीटेबल ट्रस्ट पुणे च्या कादंबरी दीदी तसेच अनेक सहकारी यांच्या शुभहस्ते वाटप केले. यावेळी कादंबरी दीदी यांनी सांगितले की अंबुलन्स ड्रायव्हर यांचा आजपर्यंत कोणीही सन्मान केला नाही. परंतु आज भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि कैलास पवार यांच्या संकल्पनेतून त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे गौरवास्पद असून असा आजपर्यंत कधीही न घडलेला हा उपक्रम आहे. यावेळी अनेक ड्रायव्हर यांनी देखील आपल्या मनोगता बरोबर आनंद स्वरूपी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिताताई पवार यांनी केले. यावेळी उपस्थित 108 अतिदक्षता विभाग डॉक्टर सागर जाधव, संजय चितळकर, सुनील पाटील, संजय दरंदले, गजानन जतआले, जालिंदर मिडगुले, दादासाहेब फराटे, स्वाती फराटे, अनिल शिवले, तसेच लहान मुले देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.