ठळक बातम्या
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त समाज कल्याण विभागातर्फे वाचन प्रेरणा उपक्रमाचे आयोजन
पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून समाज कल्याण विभागातर्फे वाचन प्रेरणा उपक्रम राबविण्यात येणार असून यानिमित्ताने समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी विभागातील अधिकाऱ्यांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात जुलै २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या ५ महिन्याच्या कालावधीत सर्व शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे, समाजमंदीरे या ठिकाणी वाचन प्रेरणा उपक्रम व वाचन स्पर्धांचे व्यापक आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकूण २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहे, ४४१ शासकीय वसतिगृहे, १६५ अनु. जातीच्या आश्रमशाळा तसेच ९० शासकीय निवासी शाळा आहेत. त्याचप्रमाणे ६७ हजार ६१८ इतक्या अनुसुचित जाती लोकवस्त्या आहेत. या सर्व ठिकाणी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
निवासी शाळांचे मुख्याध्यापक प्रत्येक शनिवारी ‘दप्तराविना शाळा’या उपक्रमांतर्गत ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा देणार आहेत. तसेच वसतिगृह अधीक्षक हेदेखील दर शनिवारी ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणार आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक पालक व गावातील मान्यवर व्यक्तींची बैठक घेऊन वाचन उपक्रमाची माहिती देतील. तसेच ‘एक व्यक्ती-एक पुस्तक भेट’ ही संकल्पना राबवून समाज सहभागातून पुस्तक पेढी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील. प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका शाळेला पुस्तके भेट द्यावीत. वसतिगृहांत विद्यार्थी, पालक, मान्यवर व्यक्ती यांची बैठक घेऊन उपक्रम राबावावा. सहाय्यक आयुक्तांनी ज्या ठिकाणी समाज मंदिर आहेत त्याठिकाणी ठिकाणी लेखक,कवी, प्रभावीपणे वाचन करणारी व्यक्ती यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करावे.
‘पुस्तक आपल्या भेटीला’ अंतर्गत परिसरातील चांगल्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन करणे. समतादूतांच्या मदतीने स्वत:हून इच्छुक असणाऱ्या व्यक्तीची, विद्यार्थ्यांची वाचन प्रेरणादूत म्हणून नेमणूक करावी. वाचन प्रेरणादूताच्या मदतीने चांगल्या पुस्तकांची माहिती तेथील घटकांना द्यावी.
शिक्षक,वसतिगृह अधीक्षक, वाचन प्रेरणादूत यांनी संबंधित घटकांना प्रत्यक्षात प्रभावीपणे प्रकट वाचन करून दाखवावे. विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षात वर्गनिहाय, गटनिहाय वाचन घेऊन येणाऱ्या अडवणीचे निराकरण करावे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. वाचन प्रेरणादूताने वाचनासाठी तेथील घटकांना प्रेरित करावे, असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले आहे.
डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग-विद्यार्थ्यांची बुद्धी आणि आकलन समृद्ध व दर्जेदार साहित्याचे वाचन केल्याने प्रगल्भ होत असते. वाचनाने मनावर सुसंस्कार होतात, विचारांना चालना मिळते. यामुळे समाजातील प्रत्येक घटकास वाचनासाठी प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे. यासाठीच वाचन प्रेरणा उपक्रमाची अंमलबजावणी सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.