ठळक बातम्या
जनतेतुन सरपंच निवड पुन्हा पूर्वव्रत केल्याबद्दल उपसरपंच अंत्रे यांनी मानले सरकारचे आभार
राहुरी : तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने थेट जनतेतुन सरपंच, नगराध्यक्ष निवड जाहीर करून प्रत्यक्षात निवडणुका घेतल्या. त्यामुळे सर्वसामान्य व होतकरू तरुणांना संधी मिळाली. यातुन चांगले काम या नेतृत्वाने केले.
परंतु ठाकरे सरकारच्या काळात हा निर्णय बदलला गेला व सर्वसामान्य घरातील नेतृत्वाची उभारणीला खिळ बसली. परंतु शिंदे फडणवीस सरकारने जनहिताचा निर्णय पुन्हा घेतल्याने निर्णयाचे स्वागत करत तरुण व सर्वसामान्य जनतेच्या वतीने किरण पाटील अंत्रे यांनी सरकारचे अभिनंदन करून आभार मानले आहे.
पुढे बोलताना किरण पाटील अंत्रे म्हणाले की, या निवडी जनतेतुनच व्हावे, म्हणून मागील सरकारला सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून राज्य सहसंघटक म्हणून अनेकवेळा पाठपुरावा केला होता. निवेदने ही दिली होती. या निवेदनात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामपंचायत हा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे ग्रामपंचायती व ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेले सरपंच सक्षम असणे गरजेचे आहे. तसेच सक्षम व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणारा असेल तर गावाचा विकास होण्यास व शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचण्यास मदत होते. त्यामुळे सरपंच निवड जनतेतुन होणे गरजेचे आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद व कोर्ट च्या केसेसही कमी झालेल्या आहे.
वास्तविक पहाता जनतेतुन सरपंच निवड ही जनतेवर अन्याय नसुन जनतेला सरपंच निवडण्याचा अधिकार आहे. काम करणारा व वेळ देणाराच सुसंस्कृत व उच्चशिक्षित व्यक्तीची निवड झाल्याने १४ व १५ व्या वित्तआयोगाचा योग्य विनियोग झाला. गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हा निर्णय फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे जनतेतुन सरपंच निवड या निर्णयावर भविष्यात पुन्हा बदल होऊ नये म्हणून याबाबत कायदा करावा. या आशयाचे निवेदन पाठवून उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे ईमेल द्वारे आभार मानले आहेत.