टेम्पोखाली दबून एक ठार, दोनजण जखमी
विलास लाटे/पैठण : पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील धनगाव फाट्यावर समोरुन जात असलेल्या मुलांना वाचविण्याच्या नादात टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो बाजुला असलेल्या हाॅटेलात घुसून हाॅटेलात चहा घेण्यासाठी थांबलेल्या तीन तरुणांच्या अंगावर उलटला. यात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, २६ रोजी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली. परमेश्वर बजारे (२८) असे मृत तरुणाचे नाव असून योगेश जाधव व (३५) डोखळे असे जखमींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावर धनगाव फाट्यावर सकाळी आठ वाजे दरम्यान पैठणहून औरंगाबादच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव टेम्पोने (एम एच ४३ ए.डी.४२०४) रस्त्यावरील मुलांना वाचविण्याच्या नादात अचानक ब्रेक दाबल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. दरम्यान नियंत्रण सुटलेला टेम्पो बाजुलाच असलेल्या एका हाॅटेलात घुसला. याप्रसंगी हाॅटेलात परमेश्वर बजारे, योगेश जाधव, पांडुरंग ढोकळे हे तीन तरुण चहा घेण्यासाठी बसलेले असताना सदर टेम्पो या तरुणांच्या अंगावर उलटल्याने टेम्पोखाली दबून तीघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारकामी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान परमेश्वरची प्राणज्योत मालवली असून अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत घटनेचा पंचनामा केला. या घटनेत दोन-तीन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी धनगाव येथील सरपंच योगेश बोबडे व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात रास्ता रोको आंदोलन करू असा पवित्रा घेतला होता. दरम्यान पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्चून मलमपट्टी करण्यात येते. यावर सा.ब.विभागाचे अभियंता लक्ष देत नाहीत. ते औरंगाबादहुन सर्व कारभार बघतात. यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. साईड पंखे देखील भरलेले नाहीत, असा आरोप धनगाव येथील नागरिकांनी या घटनास्थळी करत रोष व्यक्त केला. उलटलेल्या टेम्पोतील वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे हे करत आहेत.