छत्रपती संभाजीनगर

पैठण शिक्षक पतसंस्थेत प्रशासक नियुक्त करा

शिक्षक सेना व प्रहार शिक्षक संघटनेची सहाय्यक निबंधकांकडे मागणी

विलास लाटे/पैठण : पैठण शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कार्यकाळ १४ नोव्हेंबर रोजी संपलेला आहे. तत्पूर्वी निवडणुका होईपर्यंत प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी शिक्षक सेना व प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने सहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

पैठण तालुका शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. पैठण या सहकारी संस्थेचे निर्वाचित संचालक मंडळाची विहित मुदत १४ नोव्हेंबर २०२१ रोजी संपलेली आहे. ५ वर्षांची मुदत संपल्याने नवीन संचालक मंडळाची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. निवडणूक घेण्याच्या दृष्टीने मतदार यादी दाखल करणे, निवडणूक खर्च देणे आदी कामे विद्यमान संचालक मंडळाने सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर केलेले नाहीत.

तसेच राज्य शासनाने विद्यमान संचालक मंडळाच्या निवडणुकीला अद्यापपर्यंत कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. संचालक मंडळाला पाच वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर सहकार अधिनियम १९६० अन्वये पदावर राहण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. तसेच विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढीचे पत्रही आजच्या तारखेपर्यंत राज्य शासनाने निर्गमित केलेले नसल्याने या सर्व बाबींचा विचार करता पैठण तालुका शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.पैठण या पतसंस्थेवर लवकरात लवकर निवडणूक घेऊन नवीन संचालक मंडळ नियुक्त होईपर्यंत प्रशासक नेमणूक करणे क्रमप्राप्त असल्याने सहाय्यक निबंधक यांनी तातडीने योग्य तो निर्णय घेऊन विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याने बरखास्त करून निवडणूक होईपर्यंत तात्काळ प्रशासक नियुक्त करावा, अशी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना व प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने एकत्रितपणे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सहाय्यक निबंधक श्री.पुरी यांनी शिक्षक सेनेच्या व प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीच्या अनुषंगाने वरीष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन घेऊन एका आठवड्यात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे ठोस आश्वासन दिले आहे. 

यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हा नेते तथा शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान संचालक शौकतभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष माणिक नल्लेवाड, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, पैठण तालुकाप्रमुख अमोलराजे एरंडे, तालुका सरचिटणीस कैलासबापू मिसाळ, तालुका कोषाध्यक्ष लक्ष्मण गलांडे व तालुका प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग गोर्डे तसेच प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीणदादा वाघमोडे, जिल्हा सरचिटणीस पवनभाऊ नवथर व तालुका अध्यक्ष दिपकराव बोरुडे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button