सामाजिक

लग्नातील आहेराची रक्कम अतिवृष्टी ग्रस्तांसाठी…

फोटो : मेजर संकेत गायकवाड यांनी आहेराची व पुष्पगुच्छाची रक्कम एक लाख एक हजार रुपयाचा धनादेश राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या कडे देताना.

१ लाख १ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपुर्द

◾मेजर संकेत गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम

विलास लाटे/पैठण : यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यात खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. याची जाणीव ठेवून मेजर संकेत गायकवाड यांनी लग्नातील आहेर व पुष्पगुच्छाची रक्कम १ लाख १ हजार रुपये अतिवृष्टीग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेत सामाजिक भान जपले. याप्रसंगी उपस्थित कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे सदर रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपुर्द केला.

औरंगाबाद येथील इंजि जयवंतराव गायकवाड यांचे चिरंजीव भारतीय संरक्षण दलात मेजर पदावर कार्यरत असलेले मेजर संकेत गायकवाड यांचा विवाह नाशिक येथील पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची कन्या कस्तुरी हिच्याशी पार पडला. नाशिक येथील आर्या रिसॉर्ट येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यास राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, वैजापूरचे आमदार प्रा रमेश बोरणारे, कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी, जलसंपदाचे सहसचिव संजय बेलसरे, अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, वैजापूरच्या नगराध्यक्ष शिल्पताई परदेशी, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट, शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, औंरगाबाद जिल्हा दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, नगरसेवक दशरथ बनकर, व्यापारी महासंघाचे काशिनाथ गायकवाड ,कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे सह आदी मान्यवर उपस्थित होते. मेजर संकेतचे वडील इंजि जयवंतराव गायकवाड, आई अ.भा. माळी, शिक्षण संस्थेच्या राज्य अध्यक्ष अनिता गायकवाड, वधू कस्तुरीचे वडील पो. नि. बापूसाहेब महाजन, आई व मेजर संकेत व वधूच्या हस्ते लग्नातील आहेर व पुष्पगुच्छाची रक्कम रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भुमरे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायतानिधीस १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेले गायकवाड व महाजन कुटुंबियांनी या कार्यातून समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. असे उद्गार मंत्री भुमरे यांनी काढले असुन देशाची सेवा करतांनाच समाजातील गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मेजर संकेत च्या या संकल्पनेचे कौतुक केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button