सामाजिक
शस्त्रक्रियेसाठी मराठा एकीकरण समितीची आर्थिक मदत
मराठा सदैव अठरापगड जाती व बारा बलुतेदार यांचा मोठा भाऊ म्हणून अडचणीच्या काळात उभे राहतो – देवेंद्र लांबे पाटील
राहुरी प्रतिनिधी : येथील मराठा एकीकरण समितीच्या वतीने अपघात ग्रस्त तेजस सुभाष मोरे या तरुणास शस्त्रक्रिया करण्यासाठी ३०,०००/- रुपयांची मदत करण्यात आली आहे.
राहुरी शहरातील तेजस मोरे या युवकाचा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी रस्ता अपघातात डोक्याला मार लागून एक डोळा निकामी होवून मोठी शस्रक्रिया करण्याचे अहमदनगर येथिल श्रीदीप हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सांगितले आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्याकारणाने शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम जमविणे मोरे कुटुंबियांना जिकीरीचे झाले आहे. अशाच परिस्थितीत अपघात ग्रस्त तेजस मोरे याचा भाऊ परितोष मोरे याने मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा मराठा एकीकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे यांच्याकडे मदतीसाठी संपर्क साधला. सामाजिक बांधिलकी लक्षात घेत मराठा बहुउद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण समितीच्या वतीने मदत करण्यात आली आहे.
मराठा एकीकरण समितीच्या वतीने नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांना, गोरगरीब अडचणीत सापडलेल्या कुटुंबियांना, शैक्षणिक मदत करत आलेली आहे. समाजकारणात जिथे समाजाला गरज पडेल तिथे मराठा बहुउद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण समितीचे सदस्य एकजुटीने उभे रहात आले आहे.
राहुरी शहरातील तेजस मोरे या युवकाला शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी अपघात ग्रस्त युवकाला सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन मराठा एकीकरण समितीचे सदस्य डॉ.भारत टेमक, विनायक बाठे, अविनाश घनवट, अविनाश क्षिरसागर, अशोक निकम यांनी केले आहे.