टँकर -दुचाकीची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
विलास लाटे/पैठण : पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर जैन स्पिनर फाट्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या भीमाशंकर विद्यालयासमोर दुचाकी व टॅंकरची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार,६ रोजी दुपारी चार वाजेदरम्यान घडली. सोपान अंकुश जाधव (४०, रा.ताहेरपुर) असे जखमीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, सोपान जाधव हे दुचाकीवरून औरंगाबादच्या दिशेने जात असताना पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील भिमाशंकर विद्यालयाजवळ असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या टॅंकर व जाधव यांच्या दुचाकीची धडक झाली. यात जाधव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे व बाबासाहेब दिलवाले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढोरकीन येथील आपात्कालीन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश घोडके यांना कळविले. त्यांनी रुग्णवाहिका चालक शेख यांच्यासह घटनास्थळी दाखल होत, जखमीला औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, बाबासाहेब दिलवाले, गोंविद राऊत करीत आहे.