सामाजिक
“स्नेहालय” च्या त्या अबोल भावना- मनिषा लांबे
आयुष्यात प्रत्येक दिवस जाण्यासाठीच आलेला असतो. पण आयुष्यात काही दिवस असे येतात की मनाला शांती व सुखद समाधान देऊन जातात. तसाच माझ्या आयुष्यातील हा भाऊबीजेचा दिवस. भाऊबीज म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक! आयुष्यात माणसाला परिस्थिती खूप काही शिकवून जाते. तशाचं परिस्थितीत मीही वाढलेली.
आईला मी सांगितले की मला माझी दिवाळी माझ्या अनाथ बहीण-भावांसोबत साजरी करायची आहे आणि आपण तसेच मामाकडे जाऊयात. आईला माझे बोलन ऐकून खूप समाधान वाटले की मी दिलेले संस्कार माझ्या मुलींमध्ये आले म्हणून… सकाळी निघण्याची लगबग सुरू झाली सोमनाथ नावाचे गाडीचालक आले आणि आमचा नगरचा प्रवास चालू झाला
मामाच्या घरी गेल्यावर मामाला आपल्या बहिणीला बघून वेगळाच आनंद झाला आणि आईच्या चेहऱ्यावर मामाकडे बघून येणार हसू यातून बहिण-भावाच्या चेहऱ्यावर वेगळच प्रेम झळकत होत. जेव्हा माझा आणि मामाचा संवाद चालू झाला तेव्हा मी सांगितले मामा मी दिवाळी स्नेहालय मध्ये जाऊन साजरी करणार आहे. मामाला हे ऐकून खूपच आनंद झाला. माझ्याकडे बघून त्याचं हसण हे वेगळीच प्रेरणा देत होत. कुणीतरी आपल्या माणसांनी पाठीवर कौतुकाची थाप द्यावी अशा संवेदना जाणवल्या. मामाला घेऊन मी स्नेहालय मध्ये आली.
नावाप्रमाणेच स्नेहाने भरलेले एक गृह. आजूबाजूला खूप सगळ्या मुली होत्या. मी काचेच्या आतमधून त्यांना बघत होती. त्यांना कुणी मायेन कुरवळून घ्यावे, जवळ करून प्रेम द्यावे असे त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होते. आतमध्ये जाताना जगाच्या नकाशात भारत आणि त्यात गांधीजींची मुर्ती अगदी मनाला मोहणारी…
आम्ही सगळे आतमध्ये गेलो तिथं महेश अग्रवाल सरांनी सगळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की इथे अनाथ मुल, कचऱ्यात टाकलेली मुल, झोपडपट्टी मधील मुले, एचआयव्ही बाधित मुले इथे आणुन त्यांच संगोपन केलं जातं. डॉ. गिरीश कुलकर्णी याचे मालक आहेत हेही सांगितलं. आम्हाला त्यांनी सगळं स्नेहालय फिरून दाखवलं तिथे एक खूपच सुंदर वाक्य लिहिलं होतं.
” जिंदगी तो अपने दम पर जी जाती है……
दुसरो के उपर तो सिर्फ जनाजे उठा करते है |”
खूपच प्रेरणादायी वाक्य ते. पुढे त्यांनी आम्हाला इंग्लिश मिडियम स्कूल दाखवले. समाजात एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीसोबत भेदभाव होऊ नये आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होऊ नये म्हणून ती त्यांनी शाळा बांधली होतीी. तिथेच काही मुली मेहंदी काढत होत्या. एवढी सुरेख मेहंदी काढली होती की बघतच राहावं. पुढे जाऊन त्यांनी भविष्यातील त्यांचे प्लॅन सांगितले. काश्मीर मधली मुलं इथे आणून त्यांचा सांभाळ करतात. त्यांना योग्यप्रकारे संस्कार मिळावेत म्हणून असणारी धडपड. ज्या मुलांसाठी प्रेमाचा झरा आटलेला असतो त्या मुलाना परत प्रेम करायला स्नेहालय शिकवते.
आम्ही परत मागे फिरलो… समोरुन एक अपंग मुलगी येत होती… तिला कॅन्सर झाला होता. त्यात तिचा एक पाय गेला होता. तिच्या चेहऱ्यावरून मी तिच्या दुःखाचा अंदाज लावला. ती खूप छान डान्स करायची तिचे फोटो अगदी शाळेच्या भिंतीवर लावलेले होते. ती एवढी दुःखी असूनही तिची ती जगण्याची धडपड बघुन मी तर एकदम थक्क झाले. त्यातच एक १० वर्षाची मुलगी ५ वर्षाच्या मुलीला कडेवर घेऊन फिरत होती. त्या मुलींचं जग स्नेहालयच…!
मनात एकच विचार सुरू होता, त्यांची काही चूक नसतांना त्यांना त्या चुकीची शिक्षा मिळतेयं. काय पाप असेन त्या चिमुकल्या मुलींचं की त्याना कुणीच नाही. हे सगळे असं बघताना डोळे भरून येत होते. केबिन पाशी आल्यानंतर त्यांनी मला परिसस्पर्श आणि संवेदना हे स्नेहलयाची दोन पुस्तके दिली आमच्या सगळ्याचे आभार मानले. खऱ्या अर्थाने माझी दिवाळी साजरी झाली. निघावस तर नव्हतं वाटत पण निघण्याची वेळ झाली होती. वेळ कसा भुर्रकन निघून गेला कळलं नाही. जाताना परत एकदा त्या निरागस चेहऱ्याकडे बघितले मला माझ्या आयुष्यात खूप समाधान वाटले. माझ्या आईने मला देण्याच्या लायक बनवले मी तीचेही आभार मानले. कारण माझ्यासाठी माझी आईच परमेश्वर. दुसऱ्यांना आनंद दिला की तो आपल्यानं दुप्पट मिळतो हे ही खरेच. त्यादिवशी मामासोबत खूप सगळा वेळ घातला खूपच छान वाटले एक अधिकारी असून त्यांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही कायम गरिबांना मदत करणारे, दुसऱ्याच दुःख जाणून घेणारे, दानशूर जेवढं बोलावं त्यांच्याबद्दल कमीच…!
स्नेहालयचा निरोप घेऊन आम्ही घरच्या दिशेने निघालो परत संवाद चालू झाला माझा आणि गाडीचालक काकांचा. तुम्ही दिवाळी करा पण तुमचा आनंद अनाथ मुलांना द्या अस त्यांचंही म्हणणं. सूर्य मावळत होता आणि संवादामध्ये घर कधी आले कळलंच नाही. आयुष्यातील न विसरणारे क्षण मी स्नेहलयातून माझ्या पदरात गुंडाळून घेऊन आले होते.
– मनिषा रंजना बाळासाहेब लांबे