कृषी

जैविक इंधनावर चालणारा किफायतशीर ड्रोन विकसित करावा- केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख सद्यस्थितीत भारतात शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असून त्यांची किंमत 5 ते 6 लाखांपर्यंत आहे. जर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनची निर्मिती भारतात मोठ्या प्रमाणात केली तर त्यांची किंमत 3 ते 4 लाख रुपया पर्यंत येवू शकते. शेतकऱ्यांना जर शेतीच्या विविध कामासाठी ड्रोनचा वापर अधिक किफायतशीर करावयाचा असेल तर ड्रोनची किंमत 1.5 लाखांपर्यंत कमी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत लिथियम बॅटरीवर चालणारे ड्रोन ऐवजी जैविक इंधनावर चालणारे ड्रोनची निर्मिती केली तर ड्रोनची किंमत कमी होवून त्यांचा अवलंब शेतकऱ्यांना फवारणीसाठी करणे किफायतशीर होईल असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री, रस्ते, वाहतुक आणि परिवहन, भारत सरकार ना. नितिनजी गडकरी यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या जागतिक बँक अर्थसाहित, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देवून विविध प्रयोगशाळांची पहाणी करतांना केले.


या प्रसंगी खा.डॉ.सुजय विखे पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख उपस्थित होते. प्रकल्प संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, तसेच प्रकल्प सहसंशोधक डॉ. मुकुंद शिंदे, व डॉ.सुनिल कदम यांनी या वेळी ड्रोनचे प्रात्यक्षिक व विविध प्रयोगशाळेतील शेती उपयोगी विकसित केलेल्या विविध डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती दिली.

ना. नितिनजी गडकरी म्हणाले की, ड्रोन मध्ये वापरण्यात येणाऱ्या लिथियम बॅटरी ऐवजी जैविक इथेनॉलचा वापर करावा. तसेच शेतकऱ्यांना परवडेल असे ड्रोन विकसित करण्यासाठी देशातील विविध इलेक्ट्रोनिक्स कंपन्याशी सामजंस्य करार करुन कमी खर्चातील ड्रोनची निर्मिती करावी. बांबुची लागवड करुन त्यापासून पांढऱ्या कोळशाची निर्मिती करावी जेणे करुन वातावरणाचे प्रदुषण कमी होईल. या करीता बांबु सारख्या पर्यावरण पुरक पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोस्ताहित करावे. अशा नाविन्यपूर्ण विषयी विद्यापीठाने संशोधन करुन ते तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करावा या विषयी मार्गदर्शन करुन या प्रकल्पातंर्गत होत असलेल्या शेतकरीभिमुख कार्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान कास्ट प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात आलेल्या ड्रोन आणि रोबोटिजएस प्रयोगशाळा, फवारणी ड्रोन प्रात्यक्षिक, आयओटी आधारित मृदा सेन्सर, इत्यादी ठिकाणी भेटी देवून माहिती जाणुन घेतली. तसेच या भेटी दरम्यान कास्ट प्रकल्पातील सदस्य, संशोधन सहयोगी व इतर कर्मचारी यांच्याशी चर्चा केली व त्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button