अहिल्यानगर
महिला बचत गटांनी आपल्या उत्पादीत मालाला शासनाने सुचविलेला ब्रँड द्यावा – सत्यजित कदम
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : देवळाली प्रवरा शहरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना आता मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठ मिळु शकते, त्यासाठी बचत गटांनी आपल्या उत्पादित मालाला शासनाने सुचवलेला सोंनचिरय्या ब्रँड द्यावा व बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, यावेळी मुख्याधिकारी नेहा भोसले (IAS), उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, सभापती सचिन दूस, सौ.नंदा बनकर, सौ.उर्मिला शेटे, नगरसेवक प्रकाश संसारे, बाळासाहेब खुरुद, नगरसेविका सौ.संगीता चव्हाण, सौ.अंजली कदम, सौ.सुजाता कदम, सौ.बेबीताई मुसमाडे, सौ.प्रितिताई कदम, मुख्याधिकारी अजित निकत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले कि, देवळाली प्रवरा मध्ये २५० बचत गटांच्या माध्यमातून २५०० महिलांचे सक्षम संघटन उभे राहिलेले आहे, मागील काही वर्षांपासून महिला सक्षमीकरण साठी प्रयत्न करण्यात येत असुन इतर शहरातील बचत गटांचे काम दाखविण्यासाठी सहलीचे आयोजनही केले होते, त्याचा फायदा आज दिसुन येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. यावेळी माझी वसुंधरा योजना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या निबंध, चित्रकला, भेटकार्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनास परिसरातील नागरिकांनी भेट देऊन बचत गटांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मुख्याधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे. या प्रदर्शनामध्ये दिवाळीचे फराळ, ज्वेलरी, लेदर बेग व पर्स, कुरडई, पापड, कपडे, स्टेशनरी, पणती, फुले, लायटिंगच्या माळा विक्रीसाठी आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहा. प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले. समुदाय संघटिका सविता हारदे यांनी आभार मानले. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्राचे महेश आबुज, क्षेत्रीय समन्वयक वंदना आल्हाट, वैष्णवी खरात, हिना शेख, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी बंशी वाळके, अमोल दातीर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.