छत्रपती संभाजीनगर
दुचाकी- छोटा टेम्पोची समोरासमोर धडक; चारजण जखमी
◾दोन लहान बालकांसह दोन तरुणाचा समावेश
◾दोघांची प्रकृती चिंताजनक
विलास लाटे/पैठण : पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील धनगाव फाट्यावर छोटा टेम्पो व दुचाकी ची समोरासमोर जोराची धडक होऊन दुचाकीवरील तीन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवार,२७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोन लहान बालकांचा समावेश आहे.साईनाथ विठ्ठल कणसे (२०), भावेश नितिन भवर (८), अरविंद नितिन भवर (६), चैतन्य सोनवणे (२०) असे अपघातातील जखमींचे नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, साईनाथ कणसे हा तरुण दुचाकी (क्र.एम २० एफ.एल.५४०५) वरुन गावातील मित्र चैतन्य सह शेकटा येथून भावेश व अरविंद या दोन भाच्याला घेऊन धनगाव येथे येत असताना धनगाव फाट्यावर समोरुन औरंगाबादच्या दिशेने येत असलेल्या छोटा टेम्पो (क्र.एम एच २० डि.ई.१४७९) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार साईनाथ व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले असून चैतन्य हा किरकोळ जखमी झाला आहे. यात साईनाथच्या डोक्याला व अरविंदच्या पोटाला जबर मार लागल्याने दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
अपघात होताच टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती पैठण एमआयडीसी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारकामी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेगवान हालचाली केल्या व जखमींना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तद्नंतर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनांना बाजुला सारवून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.