छत्रपती संभाजीनगर

म्हारोळा येथे महिला किसान दिन कार्यक्रमाचे आयोजन


फोटो : म्हारोळा येथे महिला किसान दिन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती ए एम बर्गे बाजूला तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, सरपंच सविता जाधव, उपसरपंच रंगनाथ जाधव, आत्माचे प्रदीप शिंदे पाटील आदी.

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील म्हारोळा येथे शुक्रवार, २२ रोजी कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्यावतीने येथील श्रीकृष्ण मंदीरात महिला किसान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात म्हारोळा गावचे सरपंच सविता जाधव, उपसरपंच रंगनाथ जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तालुका कृषि अधिकारी एस. डी. सिरसाठ यांचे गावाच्या वतीने स्वागत केले.

महिला किसान दिनानिमित्त महीला शेतकऱ्याचा सन्मान आत्माच्या श्रीमती ए. एम. बर्गे यांच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशद करताना महीला किसान दिनामागे शासनाची भूमिका आर.पी. कारले यांनी मांडली. तसेच तालुका कृषि अधिकारी संदीप सिरसाठ यांनी शेती क्षेत्रामध्ये शेतकरी महिलांचे पूर्वीपासूनचे योगदान व त्याचे महत्त्व सांगत गटाच्या माध्यमातून एकत्रित येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत गावामध्ये शाश्वत शेती विकासाचे मॉडेल उभे करण्याचे आव्हान उपस्थित महिला शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका आरती देशपांडे यांनी प्रक्रिया उद्योग व महिलांचे योगदान विषयक माहिती दिली तसेच प्रक्रिया उद्योग उभा करत असताना जिद्द व चिकाटी ठेवून येणाऱ्या अडचणींवर कशाप्रकारे मात करायची, याविषयी माहिती देत उपस्थित महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले.  

आत्माच्या ए. एम. बर्गे यांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठेमध्ये असलेल्या मागणी विषयी महिला शेतकऱ्यांना अवगत केले व सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आव्हान केले. तसेच आत्माचे पी.एस. शिंदे यांनी गट बांधणी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेविषयक माहिती दिली व शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटाच्या माध्यमातून शासनाच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा प्रकल्प), मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट प्रकल्प), प्रधामंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पी.एम.एफ.एम.इ.) इत्यादी योजनांचा लाभ घेत मुल्यसाखळी विकसित करण्यासंदर्भात माहिती दिली. 

उपस्थित महिला शेतकऱ्यांचा उत्साह व संघटन पाहून बिडकीन मंडळाचे मंडळ कृषि अधिकारी आर.पी. कारले यांनी म्हारोळा गावामध्ये शाश्वत शेतीचे मॉडेल तयार करण्यासाठी गाव दत्तक घेत असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी कृषि सहायक पी.एल. रोकडे यांनी उपस्थित शेतकरी व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए. एस. गुरसुडे व म्हारोळा येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button